कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना नवीन वर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा देत, नवीन वर्षाची नवी सुरुवात सन्मान, सेवा आणि भक्तीच्या भावनेतून व्हावी, या उद्देशाने साई समर्थ प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक उमेदवार यांचा नागरी सत्कार व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम युवानेते विवेक कोल्हे आणि सौ.रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीत निवारा येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसर, डेली फ्रेश रोड येथे सायंकाळी ६.०० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात नागरी सत्कार समारंभाने होणार असून, त्यानंतर भक्तिमय वातावरणात राहुल खरे गौरव महाराष्ट्राचा विजेता यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे.

लोकशाही प्रक्रियेतून जनतेचा विश्वास संपादन केलेले लोकप्रतिनिधी तसेच लोकसेवेच्या भावनेतून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतलेले मान्यवर यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी समाजात सकारात्मक ऊर्जा, एकता आणि सलोखा वाढावा, हा या कार्यक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

हा कार्यक्रम साई समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक कलविंदर सिंग दडीयाल, पराग संधान मित्रपरिवार, तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व नागरिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये निवारा, कोजागिरी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी, सुभद्रानगर, येवला रोड, आढाव वस्ती, विद्यानगर, रचना पार्क परिसरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग लाभणार आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोजित या कार्यक्रमास कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे साई समर्थ प्रतिष्ठान, कोपरगाव यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


