अतिवृष्टीच्या प्रलंबित अनुदानासह विविध मागण्यासाठी अमरापूरला रास्ता रोको

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान त्वरित मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अमरापुर येथे संतप्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी ( दि.२४ ) रास्तारोको आंदोलन केले. पंधरा दिवसात सकारात्मक अंमलबजावणी न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

      तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाने अनुदान मंजुर केले मात्र ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ते अनुदान त्वरित संबंधितांच्या खात्यावर वर्ग व्हावे. तसेच यंदाही हवामानाच्या बदलाने खरीप व रब्बी पिकांना धोका झाला. त्यामुळे खरीपाची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्यात आली.

मात्र रब्बीची नजर आणी सुधारीत आणेवारी ७५ पैसे जाहीर करुन प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आता अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत लावण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

     शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी, कपाशीला ११ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, रब्बीची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, सन २०२२ -२३ मधील खरीप पिक विमा मिळावा, नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे ५० हजार रुपये अनुदान मिळावे,शेतकऱ्यांसाठी असलेली सौरपंप योजना कृषी खात्यामार्फत ऑफलाईन करण्यात यावी .अशा मागण्यांसाठी अमरापुर येथील चौकात रास्तारोको करण्यात आला.

      सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. शेतकरी मंडळाचे शिवराज कापरे, मळेगावचे माजी सरपंच चंद्रकांत निकम, अमरापुरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब पोटफोडे, सचिन खैरे, सुभाष अडसरे, सुधाकर पोटफोडे, दिलीप पोटफोडे आदिसह शेतकरी सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी संतोष गर्जे यांनी निवेदन स्विकारल्या नंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले.