कोपरगाव तालुका सर्दी खोकल्याने झाला बेजार

 उपचारासाठी दररोज शेकडो नागरीक दवाखान्यात

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर असताना कोपरगाव तालुक्यातील शेकडो कुटुंबे सर्दी खोकल्याच्या आजाराने व्याकुळ झाले आहेत. बदलत्या ऋतू बरोबर वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे नागरीकांच्या शारिरिक समस्या वाढल्या आहेत. शहरासह तालुक्यात एकाच कुटुंबातील अनेकजण सर्दी, खोकला, अंगात बारीक ताप, घसा खवखव करणे, डोकं जड पडणे, अशक्तपणा जाणवणे आणि विशेषतः घसा बसण्याच्या समस्याने व्याकुळ झाले आहेत.

काही रुग्णांचा खोकला, सर्दी, ताप  कित्येक दिवसांपासून बरा होतच नाही. शंभर टक्के आजारी पडूनही नाही, ना सुदृढ स्थितीही नाही अशा अर्धवट अवस्थेत कोपरगावचे नागरीक औषधावर औषधे घेवून अनेक प्रयोग करीत खोकला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाच कुटुंबातील अनेकजण एकाचवेळी  आजारी पडल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. 

 या संदर्भात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले सध्या तालुक्यात २५ टक्के नागरीक खोकला सर्दीने बेजार झाले आहेत. वातावरणातील बदल व एकमेकांच्या संसर्गाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही डॉ. सचिन यादव यांनी सांगितले.

सध्याच्या रोगराई  संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, गेल्या दोन वर्षात बहुतांश नागरीक तोंडाला मास्क लावत होते त्यामुळे किरकोळ धुळीने व बदलत्या वातावरणानुसार होणारे संसर्गजन्य आजार होत नव्हते माञ सध्या बहुतांश नागरीक तोंडाला मास्क लावणे बंद केले. खाण्यापिण्यात कोणतेही बंधन नाहीत. विशेषत शहरात व तालुक्यात रस्ते व्यवस्थित नसल्याने तालुका धुळीने माखला आहे.

सध्याचे वातावरण अजब गजब आहे. पहाटे अचानक कडाक्याची थंडी असते तर दुपारी सुर्य आग ओकत असल्याने प्रचंड गरमी वाढते. कडाक्याची थंडी रखरखते ऊन आणि धुळीच्या लाटेवर लाटा येत असल्याने नागरीकांच्या शरीरावर त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. घशात खवखव करण्याबरोबर नागरीकांचा घसा बसत असल्याने खोकल्या सोबत रुग्णांची घशामुळे बोलती बंद झाली आहे. दहा दिवस खोकला कमी होत नाही. अनेकांना मुदतीचा खोकला झाला आहे.

सध्या जरी वातावरणातील बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असले तरी फार काही धोका नाही. वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केले तर रुग्ण लवकरात लवकर बरे होतात. माञ अनेक दिवस खोकला असुनही दुर्लक्ष केले तर खोक्याचे रूपांतर कफ निर्माण करण्यात होईल त्यातुन निमोनिया सारखा आजार होण्याची शक्यता दाट आहे. तेव्हा नागरीकांनी वेळेत दवापाणी घेणे गरजेचे आहे.

नागरीकांनी बाहे फिरताना तोंडाला मास्क लावून धुळीपासुन संरक्षण करणे, बर्फाचे थंड पदार्थ खाण्याचे टाळावे. नागरीकांनी घाबरुन जावू नये. जरी ही खोकल्याची लाट असली तरी इतर मोठा कोणताही धोका नाही. परंतु वेळेवर औषधं घेणे महत्त्वाचे आहे.

 कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशेपेक्षा अधिक रुग्ण केवळ सर्दी खोकल्याने परेशान झालेले येत आहेत. सध्या तालुक्यात सर्दी खोकल्याचा संसर्ग वाढत आहे. नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. एकाला लागण झाल्यानंतर त्याची  इतरांना बाधा होते तेव्हा नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

 शहरात धुळीचे साम्राज्य असल्याने सध्या नागरीकांना श्वसनाचे विकार वाढले आहेत. डोळ्यात सतत धुळ जात असल्याने डोळ्यांचे विकार वाढले, सर्दी खोकला तर नित्त्याचा झाला आहे.