शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : तालुक्यातील गदेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीचे स्वयंपाक कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ‘भाकरी बनविणे’ हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमात इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वतः साहित्य आणून पारंपरिक पद्धतीने चुलीवर बाजरीच्या भाकरी व आमटी बनवली. शाळेतील आवारात अंगतपंगत करून विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेत आनंद लुटला.

कार्यक्रमासाठी गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना गणवेशांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गुंजाळ यांनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. इतर शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी गदेवाडीच्या सुकन्या व ज्येष्ठ कीर्तनकार मीनाताई मडके यांनी, शाळेत राबविण्यात आलेल्या अशा उपक्रमामुळे शाळेतील वातावरण शिक्षणाबरोबरच स्वावलंबन व संस्कारांची मूल्ये रुजवणारे ठरले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
