समृद्ध कोपरगावसाठी एकजुटीने काम करू – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात दैनंदिन जीवनात व उद्योग-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी काळानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. राजकारणात जर निकोप स्पर्धा झाली. तर कोपरगावच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशने सुरू केलेला ‘आपली खरेदी आपल्या गावात’ हा उपक्रम कौतुकास्पद असून, या उपक्रमामुळे कोपरगावच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढणार आहे. कोपरगाव समृद्ध बनविण्यासाठी व्यापारी, उद्योजकांसह सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी महासंघ शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी (१७ डिसेंबर) समता पतसंस्थेच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी (संगमनेर), तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, आ. आशुतोष काळे, अनुराधा मालपाणी, किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, कार्याध्यक्ष सुधीर डागा, अजित लोहाडे, उपाध्यक्ष केशव भवर, नारायण अग्रवाल, कोषाध्यक्ष तुलसीदास खुबाणी, महासचिव प्रदीप साखरे, गुलशन होडे, किरण डागा यांच्यासह व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सर्व संचालक, सभासद, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय मालपाणी व विवेक कोल्हे यांच्या हस्ते ग्राहक सन्मान योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व व्यापारी महासंघाचे संचालक गुलशन होडे, महावीर सोनी, संतोष गंगवाल व अन्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या योजनेला पाठबळ दिल्याबद्दल विवेक कोल्हे यांचा व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगावच्या बाजारपेठेला उर्जितातावस्था आणण्यासाठी तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनने यंदा दसरा, दिवाळी सणानिमित्त ‘आपली खरेदी आपल्या गावात’ हा उपक्रम सुरू केला. त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतच खरेदी केली तर स्थानिक बाजारपेठेतील अर्थव्यवस्थेला गती मिळेल. स्थानिक व्यापाऱ्यांनी नफा बाजूला ठेवून ग्राहकांचा विश्वास संपादन करून गुणवत्तापूर्ण उत्तम सेवा दिली तर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढेल. डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितलेला महामंत्र व्यापाऱ्यांनी अवलंबला तर ते आपल्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होतील.

प्रास्ताविकात राजकुमार बंब म्हणाले, कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेतील उलाढाल वाढवण्यासाठी व्यापारी महासंघ व तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनने ‘आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये’ अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्वतः दिवाळीला स्थानिक बाजारपेठेत खरेदी करत ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे ग्राहकांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गालगत ‘स्मार्ट सिटी’ होणार होती. पण दुर्दैवाने ती गेली. ही ‘स्मार्ट सिटी’ झाली असती तर तालुक्याच्या विकासाला गती मिळाली असती. कोपरगाव तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, दौंड-मनमाड रेल्वेमार्ग, नगर-मनमाड महामार्ग, नागपूर-मुंबई जलदगती महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग गेलेला आहे. कोपरगाव मतदारसंघात शिर्डी विमानतळ, कोपरगाव, पुणतांबा, साईनगर शिर्डी आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके असून, प्रस्तावित सूरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात आहे. रेल्वे, रस्ते व हवाई मार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारे कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, या भागात व्यापार, उद्योग वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा व अनुकूल परिस्थिती आहे. स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.

शिर्डीजवळ सावळी विहीर व चांदेकसारे-सोनेवाडी शिवारात नवीन एमआयडीसीला सरकारने नुकतीच मंजुरी दिली असून, या नवीन एमआयडीसीत भविष्यात अनेक नवीन उद्योगधंदे सुरू होणार आहेत. त्यामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून, कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. कोपरगावकरांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यासाठी व ती विकसित करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली. काका कोयटे यांनी व्यापारी महासंघ व पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून मोठे काम केले असून, त्यांनी यापुढे कोपरगावात सामाजिक, राजकीय क्षेत्रात समतोल साधला तर विकासाला गती मिळेल, असेही ते म्हणाले. 

यावेळी उद्योजक डॉ. संजय मालपाणी यांनी श्रीमदभगवत गीतेतील श्लोकांचे दाखले देत आपल्या ओघवत्या शैलीत ‘बदलत्या व्यापार पद्धती’ या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज सगळीकडे ‘मॉल संस्कृती’ फोफावत आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता सचोटीने व्यवसाय करावा. ग्राहकांचा विश्वास संपादन करून ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देऊन आपल्यासोबत जोडून ठेवावे. आपल्या वर्तणुकीत काळानुसार बदल करावा. खर्चात बचत व गुणवत्ता वाढीवर भर द्यावा. मन स्थिर ठेवून बुद्धिकौशल्य वापरून काम केले पाहिजे.

आपल्या पंचेंद्रियांवर व भाव-भावनांवर नियंत्रण ठेवले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. संवाद व सहकार्यातून नवीन गोष्टी घडत असतात. संघर्षातूनच समृद्धी प्राप्त होते. योग्य म्हणजे समता-समत्व, दैनंदिन जीवनात काम करताना व सुख-दु:खात मनाचा समतोल राखला पाहिजे. श्रीमद् भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यात रणांगणावर झालेला संवाद नसून तो अखिल मानवजातीच्या जीवनमूल्यांचा सार आहे. संजीवनी उद्योग समुहातर्फे विवेक कोल्हे यांनी डॉ. संजय मालपाणी यांचा सत्कार केला. सुधीर डागा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. केशव भवर यांनी आभार मानले.