संजीवनी अकॅडमीच्या ओम मोरेचा आयबीएम कडून गौरव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ :  आयबीएम या जगातील सर्वात जुन्या साॅफ्टवेअर कंपनीने भारतात राष्ट्रीय पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. यात संजीवनी अकॅडमीच्या ओम नानासाहेब मोरे या विद्यर्थ्याने अंतिम फेरीत प्रवेश  केला. कंपनीने त्याला दिल्ली येथे आमंत्रित केले व आयबीएम स्कील्स बिल्ड या वार्षिक  सम्मेलनात त्याने तयार केलेल्या प्रोजेक्टवर पाॅवरपाॅईंट सादरीकरण देण्यास सांगीतले.

यातही बाजी मारत आयबीएम कंपनीकडून गोल्डन बॅच विनर पुरस्कार मिळवुन संजीवनी अकॅडमी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही देशात आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले. संपुर्ण भारतातुन फक्त दोनच स्पर्धक अंतिम फेरीत पोहचले त्यात ओमचा या शेतकऱ्याच्या मुलाचा समावेश  होता, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, ओमने संजीवनी अकॅडमीतील काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम आयबीएम कंपनी संचलित रोबोटिक्स, कोडींग, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा सायन्स, डिझाईनिंग, क्रीटिकल थिंकिंग, असे सुमारे २०० कोर्सेस करून ऑनलाईन परीक्षेमध्ये यश  संपादित केले. त्याच्या या प्रतिभा सपन्नतेची दखल घेवुन त्याला दिल्ली येथे आयबीएम कंपनीने ‘इम्प्यॅक्ट टाॅक’ अंतर्गत त्याला त्याच्या ‘अनिमल डिस्ट्रॅक्टर ’ प्रकल्पावर सादरीकरणाची संधी दिली.

या प्रकल्पा अंतर्गत ओमने निरूपद्रवी प्राण्यांपासुन शेताचे संरक्षण कसे होेवु शकते, हे सिध्द केले. या उपकरणाला निरूपद्रवी प्राण्यांची सेन्सरद्वारे चाहुल लागते व लागलीच या उपकरणाद्वारे तेजस्वी प्रकाश पडून मोठा आवाज होतो. त्यामुळे शेतीचे नुकसान करण्यासाठी तसेच मनुष्य आणि पशुधनावर आक्रमण करणारे प्राणी दुर पळून जातात.

खरे तर ओमने मिळविलेले यश हे अभियांत्रिकी क्षेतातील असुन हे शिकण्यासाठी पाॅलीटेक्निक अथवा इंजिनिअरींग काॅलेजमध्ये शिक्षण घ्यावे लागते. मात्र संजीवनी अकॅडमीमध्ये स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांच्या कल्पकतेनुसार हे बहुतांशी  शिक्षण शालेय पातळीवर देवुन विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी निर्माण करण्यात येते. यामुळेच ओमने राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केले आहे.

ओमच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्याला गोल्डन बॅच विनर या पुरस्काराने दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात डॉ. ऋषीकेश पाटणकर यांचे हस्ते गौरविण्यात आले. ओम मोरेच्या राष्ट्रीय यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी ओम, प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम, प्राचार्या शैला झुंजारराव व मार्गदर्शक आदित्य गायकवाड या सर्वांचे अभिनंदन केले.