कोपरगाव तालुक्यात तातडीने युरियाचा पुरवठा करा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके जोमदारपणे उतरली आहेत. परंतु रब्बी पिकांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे युरिया खत शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात युरियाचा तातडीने पुरवठा करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.

 दिलेल्या पत्रात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, रब्बी हंगाम सुरु असतांना  कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताचा गंभीर तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले युरिया खत सेवा सहकारी संस्था व कृषी सेवा केंद्रांमध्ये शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावर्षी रब्बी पिकांसाठी वातावरण अतिशय चांगले व पोषक असून ऊस, गहू, मका, कांदा आदी पिके जोमात असले तरी पिक वाढीसाठी युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

 शेतकऱ्यांना वेळेवर युरिया खत मिळत नसल्याने त्याचा पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू  शकते. ही बाब गंभीर असून त्याबाबत प्रशासनाने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाला तोंड देत शेतकरी शेती व्यवसाय करीत असतांना ऐन रब्बी हंगामात ऊस, गहू, मका, कांदा या पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

युरियाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तालुकानिहाय मागणीचा आढावा घेवून आवश्यकतेनुसार अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावा. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घेवून शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोपरगाव तालुक्यात नियमित युरिया खताचा पुरवठा करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिल्या आहेत.

Leave a Reply