गोदाकाठ महोत्सवात दोनच दिवसात ६० लाखाची उलाढाल

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व  जिल्हा बँकेच्या मा.संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या गर्दीने रोज गर्दी वाढत जाणार असल्याचे संकेत दिले होते.

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील गोदाकाठ महोत्सवाला हजारो नागरीकांनी भेट दिल्यामुळे गोदाकाठ महोत्सवात नागरीकांचा महासागर उसळला होता. नागरिकांनी  मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे दोनच दिवसात जवळपास ६० लाखाची उलाढाल झाली असून नागरिकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे गोदाकाठ महोत्सवात सर्वत्र जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेली देशी उत्पादने, गृहउद्योगातून साकारलेल्या वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, वस्त्रोद्योग, शोभेच्या वस्तू, पारंपरिक कलाकुसर, शेतीपूरक उत्पादने तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री जोरात सुरू आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी उत्साहाने खरेदी करत महिला उद्योजकांना मोठे प्रोत्साहन दिले.

विशेषतः महिलांनी तयार केलेल्या घरगुती पदार्थांना व हस्तकलेच्या वस्तूंना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे.या महोत्सवाचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या कौशल्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक उद्योजकतेला चालना देणे हा आहे. दोनच दिवसात ६० लाखाची  झालेली मोठी आर्थिक उलाढाल ही या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारी ठरली आहे.

प्रत्येक स्टॉल्सवर पहिले दोन दिवस नागरिकांनी खरेदीसाठी केलेल्या मोठ्या गर्दीचा विचार करून रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे तिसऱ्या दिवशी देखील मोठी गर्दी होणार असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी जास्तीत जास्त माल विक्रीसाठी आणून ठेवला आहे. महिला बचत गटाचे आर्थिक सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना आपले कला, गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ त्याचबरोबर समाजात आदर्शवत कामगिरी करणाऱ्या समाजकारणी व्यक्तींना समाजकार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी त्यांचा यथोचित सन्मान गोदाकाठ महोत्सवात आवर्जून केला जातो.

यावर्षी देखील कोपरगाव मतदारसंघातील माजी सैनिक, वीर माता, स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका, आपापल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले व्यक्ती, वृत्तपत्र विक्रेते, पोस्ट विभागातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य, कृषी विभागातील कर्मचारी, बँक व पतसंस्थांचे कर्मचारी, जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचे शिक्षक,व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, महिला व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, विविध समाजांचे प्रतिनिधी यांचा आ.आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गोदावरी दूध संघांचे अध्यक्ष राजेश परजणे, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदाकाठ महोत्सवात खरेदी व समाज प्रबोधनासोबतच सेल्फी पॉईंटवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः तरुणाईसह कुटुंबीय, महिला व ज्येष्ठ नागरिक या सेल्फी पॉईंटवर आठवणी जतन करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.हा आकर्षक सेल्फी पॉईंट जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. यामाध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले आहे.सेल्फी पॉईंटवर तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळे, देवस्थाने, परंपरा व सांस्कृतिक ओळख दर्शविणारी कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. यामुळे केवळ छायाचित्र काढण्यापुरता हा सेल्फी पॉईंट मर्यादित न राहता, नव्या पिढीला आपल्या धार्मिक वारशाची ओळख करून देणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. नागरिक सेल्फी घेताना त्या पार्श्वभूमीमागील इतिहास, श्रद्धा व परंपरांबाबत चर्चा करताना दिसत असून, हा उपक्रम संस्कृती जपण्याचा आणि अभिमान निर्माण करण्याचाएक अभिनव प्रयत्न असल्याचे मत आलेल्या नागरीकांकडून व्यक्त केले जात आहे. गोदाकाठ महोत्सवात आर्थिक व्यवहार, समाजप्रबोधन आणि धार्मिक-सांस्कृतिक वारसा जपण्याचे त्रिसूत्री उद्दिष्ट साध्य होत असल्याचे या सेल्फी पॉईंटमुळे अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply