कोपरगाव मतदार संघ दहशत मुक्त करा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव मतदार संघात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू, मुरूम, मातीचा बेसुमार उपसा सुरु असून शेतकऱ्यांचे वीज पंप आणि केबल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय बोकाळले असून अवैध व्यवसायातून मिळणाऱ्या आडमाप पैशामुळे हातात गावठी कट्टे घेवून तयार करण्यात आलेले रील्स सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे.

एवढेच नव्हे तर कमी कष्टात आणि कमी वेळात मोठा आर्थिक मोबदला मिळत असल्यामुळे तरुणाई अवैध व्यवसायाच्या विळख्यात अडकत चालली आहे. या सर्व अवैध व्यवसायाला महसूल, पोलीस प्रशासनाची साथ मिळत आहे. त्यामुळे अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी एकत्रितपणे संघटीत गुन्हे दाखल करून कोपरगाव मतदार संघातील अवैध व्यवसायांचे पाळमूळ कायमची उपटून टाकून कोपरगाव मतदार संघ दहशत मुक्त करावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव मतदार संघात बिघडलेल्या कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत आ.आशुतोष काळे चांगलेच आक्रमक झाले असून  शनिवार (दि.२४) रोजी शिर्डी उपविभागीय कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या समवेत बैठक घेवून अनेक अवैध व्यवसायांचे फोफावत चाललेले जाळे याकडे लक्ष वेधत त्यांच्यापुढे  सुरु असलेल्या अवैध व्यवसायांचा त्यांनी पाढाच वाचला.

कोपरगाव मतदार संघातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा सुरु आहे.  त्याचबरोबर वनविभागाच्या जमिनीतून मुरूम, माती उपसा करण्यात येत असून त्यासाठी दुसऱ्या राज्यातून मशिनरी आणण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे वीज पंप आणि आणि केबल चोरी होत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मटका, जुगार अड्डे, चक्री, बिंगो, गुटखा विक्री अशा धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

सहजरीत्या कमी कष्टात आणि कमी वेळात मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाई होत असल्यामुळे अनेक तरूण या अवैध व्यवसायाकडे ओढले जात असून गैरमार्गातून आलेल्या  पैशातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्ती नशा करून हातात गावठी कट्टा घेवून रील्स तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करीत आहे. शाळा महाविद्यालय परिसरात बंदी असतांनाही तंबाखू-गुटखा विक्री सुरु असून अवैध धंद्यामुळे वाढलेल्या गुन्हेगारीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे.

कोपरगाव मतदार संघातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरटीओ, स्थानिक गुन्हे शाखा या सर्व  विभागांनी एकत्रित कारवाई केल्याशिवाय अवैध व्यवसायांना आळा बसणे अशक्य आहे.त्यासाठी आपण व्यक्तिश: लक्ष घालून अवैध व्यवसायिकांच्या विरोधात कडक पावले उचलावीत व महसूल, पोलीस आणि एक्साईज या विभागातील ज्या विभागात जास्तीत जास्त कडक शिक्षेची तरतूद असेल त्या विभागातून कारवाई करावी.

तसेच राज्यमार्ग ६५ वरून होणारी झगडे फाटा मार्गे अहिल्यानगर व संगमनेरकडे होणारी अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी यावेळी या बैठकीत केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस आणि महसूल विभागाच्या दोन स्वतंत्र टीम तयार करून एकाचवेळी दोन्ही विभागाकडून एकत्रित कारवाई करून अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांना दिली असून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डी.वाय.एस.पीअमोल भारती, प्रांताधिकारी माणिकराव आहेर उपस्थित होते.

Leave a Reply