कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : राहाता तालुक्यातील वाकडी म्हटले की, राजकीयदृष्ट्या अनेकांच्या छातीत धडकी भरवणारे गाव म्हणून त्याची ओळख आहे. कुठल्या दिशेला जावे, एकमताने कोणाचा कार्यक्रम लावायचा हे याच ठिकाणी ठरते. त्यामुळे हा नुसता सत्काराचा फेटा नसून, एक जबाबदारीची जाणीव वाकडी ग्रामस्थांनी नगरसेवकांना करून दिली आहे. पूर्वीपासून गणेश परिसराचे कोल्हे परिवारावर, तसेच स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांवर नितांत प्रेम राहिले आहे. हेच प्रेम तुम्ही भविष्यातही द्याल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले, त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन केले.

यासाठी राहाता तालुक्यातून आपण चांगले उमेदवार व चांगले प्रतिनिधी देणार आहात. निश्चितपणाने वाकडी-पुणतांबा सहित गट व गण येत्या काळात आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत. यासाठी आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. आपल्या सर्वांना ठरवायचे आहे की, आपण गुलामी स्वीकारायची की, गुलाल उधळायचा. म्हणून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण गुलालच स्वीकारणार, अशी मला खात्री आहे. श्री खंडेरायाचा भंडारा आपण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उधळणारच आहोत, असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेतेपदी प्रसाद आढाव तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान सोहळा राहाता तालुक्यातील वाकडी येथील मारुती मंदिरामध्ये युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी चितळी, जळगाव, रामपूरवाडी, वाकडी, गणेशनगर, धनगरवाडी, शिर्डी, राहाता, नांदूर, पुणतांबा, नपावाडी आदीसह गणेश परिसर राहता तालुक्याच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते. याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, श्री गणेशचे चेअरमन सुधीर लहारे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय निवड विष्णुपंत शेळके यांनी केली. प्रास्ताविक शिवाजी तात्या लहारे यांनी केले. वाकडी सोसायटी, हायस्कूल व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत वाकडी, वाकडी सोसायटी, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे सर्व विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आभार बी. एल, आहेर यांनी मानले. ते पुढे म्हणाले की, राजकारणात अनेक वर्षांनंतर कोपरगाव नगरपालिकेमध्ये आम्ही विजय मिळवला आहे. याआधी सोसायटी, कारखाने, संस्था तसेच विविध ठिकाणी आपण विजय मिळवले. परंतु खऱ्या अर्थाने सन २०१४ मध्ये माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना चांगले मताधिक्य दिले होते. त्यानंतर सातत्याने अकरा वर्षे विजयाचा गुलाल प्राप्त झालेला नव्हता, आणि तो गुलाल आता कोपरगाव नगरपालिकेच्या रूपाने मिळाला आहे.

राजकारण हे तात्विक असावे, निवडणुकीपुरता विरोध असावा; मात्र निवडणूक झाल्यानंतर विरोध बाजूला ठेवून विकासावर काम केले पाहिजे. अगदी याच भावनेने श्री गणेश सहकारी साखर कारखाना असो किंवा कोपरगाव नगरपरिषद, या ठिकाणी त्याच पद्धतीने काम सुरू आहे.खरंतर सहकारात राजकारण आणणे योग्य नाही. परंतु जशी गणेश कारखान्याची निवडणूक पार पडली, त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून कारखान्याच्या पूरक नव्हे, तर कारखाना अडचणीत कसा येईल यासाठी अनेक शक्ती एकत्र येऊन पावले उचलत आहेत. मात्र विरोधकांनी श्री गणेश कारखाना असो किंवा अन्य कोणत्याही संस्था, त्यांना आडवे येऊ नये, अशी सद्बुद्धी श्री खंडोबारायाने व मारुतीरायाने विरोधकांना द्यावी.

आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत, मात्र सत्ता अजून आमच्या हाती नाही. परंतु आम्हाला सत्तेत जायचे आहे. सत्ताधारी पक्षात असतानाच विरोधकांनी आमची एवढी धास्ती घेतली असेल, तर सत्तेत गेल्यावर काय होईल याचा त्यांनी विचार करावा. मागील अनेक वर्षांपासून आमदार आशुतोष काळे लोकप्रतिनिधी आहेत; मात्र मतदारसंघातील वस्तुस्थिती पाहिली, तर कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. आम्ही भविष्यात सत्तेत गेल्यावर निश्चितपणाने यापेक्षा कितीतरी पटीने ताकद व अधिक विकासकामे गणेश परिसरात केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.


