मायेचे छत्र हरपले, अजितदादांच्या आठवणींनी आ.आशुतोष काळे भावुक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी व राज्याच्या जनतेला सुन्न करून टाकणारी असून माझ्यासाठी आयुष्यातील ही अत्यंत वाईट घटना आहे. अजितदादा माझ्यासाठी फक्त एक राजकीय नेते नव्हते तर ते एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्यावरील माझा विश्वास, प्रेम आणि आदर आणी त्यांनी दिलेलं प्रेम शब्दांत मांडता येणार नाही. अजितदादांनी मला मुलाप्रमाणे जीव लावत मतदार संघाच्या विकासाची प्रत्येक मागणी पूर्ण करतांना माझे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते त्यामुळे मला जीव लावणारे माझ्या मायेचे छत्र हरपले आहे अशा शब्दांत आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी माझे नाते नेतृत्व आणि कार्यकर्ता यापलीकडचे होते. ते नेहमीच समजून सांगतांना  आणि मार्गदर्शन करतांना त्यांच्या शब्दांनी मनाला उभारी मिळायची. अजितदादांचा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाशी विशेष जिव्हाळा आणि प्रेम होते. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, शेती आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर दिलेला निधी केवळ सहकार्य व मदत नसून दादांनी कोपरगावावर केलेल्या जीवापाड प्रेमाचा ठसा आहे.

आदरणीय दादांचा माझ्यावर प्रचंड विश्वास असल्याने माझ्या प्रत्येक प्रयत्नामागे ते खंबीरपणे उभे राहिले. कठोर निर्णयक्षमता आणि मनातील माणुसकी यांचा अद्भुत संगम म्हणजे अजितदादा होते. आज त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यात आणि देशात असंख्य नेते आणि कार्यकर्ते घडले. याच बरोबर राज्यातील विविध मतदारसंघांना विकासाची दिशा मिळाली आहे. त्यांच्यासारखा स्पष्ट, निर्भीड आणि विकासाभिमुख नेता आजच्या राजकारणात दुर्मीळ आहे.

दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली असून ती कधीच भरून निघणार नाही. अजितदादा यांच्या अकस्मात जाण्याने माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला असल्याची भावना आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.

 राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने एक दिलखुलास,अभ्यासू आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी असलेला नेता राज्याने गमावला आहे. ही दुःखद घटना दुर्दैवी आणि मनाला तीव्र वेदना देणारी अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत मा.अजितदादा पवार यांच्यासोबत विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण जडणघडणी बरोबरच कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अजितदादा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या निधनाने जीवनातील अतिशय जवळचा जिवलग मित्र कायमचा दूर सोडून गेला आहे. – मा.आ.अशोकराव काळे

Leave a Reply