पाणी उपलब्धतेनुसार पिकांचे नियोजन करा – कृषिअधिकारी सोनवणे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ :  एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामात पर्जन्यमान व पाणी उपलब्धतेमध्ये अनिश्चितता राहण्याची शक्यता लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून रब्बी हंगामाचे पीक नियोजन करावे, असे आवाहन  कोपरगाव तालुका कृषी अधिकारी, मनोज सोनवणे  यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 

रब्बी पिकांचे नियोजन कसे करावे याबात सोनवणे यांनी सांगितले की,   उपलब्ध पाणी व जमिनीची प्रत लक्षात घेऊन पिकांची निवड व क्षेत्राचे नियोजन करावे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास कमी कालावधीची व कमी पाण्यावर येणारी पिके निवडावीत. पाण्याची गरज जास्त असलेल्या पिकांचे क्षेत्र उपलब्ध सिंचन क्षमतेनुसार मर्यादित ठेवावे. शक्य असल्यास लवकर येणाऱ्या व पाण्याची कार्यक्षमतेने उपयोग करणाऱ्या वाणांची निवड करावी. 

उपलब्ध पाण्याचा पीक निहाय व क्षेत्रनिहाय आराखडा तयार करावा. पिकाच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. अनावश्यक पाणी देणे टाळून पाणी बचत व कार्यक्षम वापर करावा. शेतातील बांधबंदिस्ती, सेंद्रिय पदार्थांचा वापर व आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा. शक्य तिथे ठिबक सिंचनाचा वापर करावा. – गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व इतर योग्य पिकांमध्ये उपलब्ध तंत्रज्ञानानुसार तुषार/ठिबक सिंचनाचा कार्यक्षम वापर करावा.

सिंचनाची वेळ व कालावधी पिकाची गरज, जमिनीचा प्रकार व हवामानानुसार ठरवावा.   उपलब्ध परिस्थितीनुसार शेततळे खोदण्याचे व अस्तित्वातील शेततळ्यांचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन करावे. पावसाचे उपलब्ध पाणी शेततळ्यात साठवून त्याचा वापर संरक्षित सिंचनासाठी करावा. शेततळ्यातील पाण्याचा वापर काटकसरीने करून संपूर्ण हंगामासाठी पाणी नियोजन करावे.

पाणीटंचाईच्या परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धता टिकविणे अत्यंत आवश्यक आहे. उपलब्ध पाण्यानुसार चारा पिकांचे क्षेत्र नियोजित करावे. कमी पाण्यात उपलब्ध होणाऱ्या चारा पिकांना प्राधान्य द्यावे. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा व कडबा यांचे शास्त्रीय पद्धतीने साठवण व व्यवस्थापन करावे. पशुधनाच्या संख्येनुसार भविष्यातील चारा गरजेचे नियोजन करावे.

पाणी आहे म्हणून पीक घेऊ नका; उपलब्ध पाण्यानुसारच पीक निवडा! कमी पाणी + योग्य पीक नियोजन + ठिबक/तुषार सिंचन + शेततळे + चारा व्यवस्थापन = सुरक्षित रब्बी हंगाम

आगामी रब्बी हंगामात संभाव्य पाणीटंचाई व हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन सर्व शेतकरी बांधवांनी पाणी उपलब्धतेनुसार पीक नियोजन, पाणी बचत, सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, शेततळ्यांचा वापर आणि चारा व्यवस्थापन यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे. 

Leave a Reply