शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : परिसरातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील ऊस दर जाहीर करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांचा उस प्राधान्याने गळीपासाठी घेवून स्थानिक ऊस उत्पादक शेतक-यांना प्राध्यान्यक्रम देण्याच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगावच्या तहसीलदारांना देण्यात आले.
तसेच मागणीच्या पाठपुराव्यासाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या शिष्टमंडळासह ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर व गंगामाई साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना देखील याबाबतचे निवेदन देवून या हंगामात परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना प्राधान्यक्रम देवून न्याय देण्याची मागणी केली.
निवेदनात म्हंटले आहे की, मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये शेवगाव पाथर्डी तालुक्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने ऊसाचे पीकही मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. त्यामुळे कारखान्याच्या पूर्ण हंगामात गळीपाला पुरेल इतक्या प्रमाणात ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध असतानाही काही साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गेटकेनने मोठ्या प्रमाणात आणल्याने स्थानिक कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांसमोर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या.
शेवटच्या टप्प्यात तर परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना आपला ऊस तोडण्यासाठी एकरी १० ते १५ हजार रुपये ऊस तोड करणाऱ्या टोळ्यांना देण्याची वेळ आली. तसेच उसाच्या तोडीचा कालावधी वाढल्याने ऊसाचे वजनही घटले. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासही सहन करावा लागला.
त्यांमुळे यंदाच्या हंगामातही मागील वर्षी प्रमाणे ऊस उत्पादक शेतक-यांचे हाल होवू नयेत यासाठी तहसील कार्यालयाने प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील सर्व साखर कारखान्याच्या संबधितांच्या उपस्थितीत बैठक घेवून त्या बैठकीत सर्व साखर कारखान्याचे यंदाच्या हंगामाचे भाव जाहीर करून सर्व साखर कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस गळीतासाठी प्राधान्याने घेवून त्यांना दिलासा देण्याचा निर्णय जाहीर करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, लक्ष्मन मोरे, सागर गरुड, संजय कांबळे, राजेंद्र नाईक, संगीता ढवळे, मनीषा आंधळे, सुनील मीरपगार, शेख सलीम जिलानी, दीपक वाघमारे, विष्णू वाघमारे, शरद गालफाडे, अशोक काळोखे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.