कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उसतोडणी कामगारांसाठी न्यु इंडिया इंशुरन्स कंपनीकडुन गन्ना कामगार अपघात विमा योजना उतरवलेली आहे. त्यात २०२०-२१ गळीत हंगामात उसतोडणी कामगारांचा रस्ते अपघातात मृत्यु झाला होता त्याच्या वारसांना तीन लाख रूपयांचा धनादेश उपाध्यक्ष रमेश घोडेराव व कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.
याबाबतची माहिती अशी की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर वैजापुर विभागातुन बैलगाडीच्या सहाय्याने विलास जिजाउ पवार हे उस वाहतुक करत असतांना त्यांच्या बैलगाडीस ट्रक टँकरने लौकी शिवारात संस्कृती हॉटेल जवळ धडक दिली त्यात त्यांचा व बैलाचा जागीच मृत्यु झाला होता.
याप्रसंगी कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी संबंधीत मृतांच्या वारसाकडुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या सुचना दिल्या व अमृत संजीवनी शुगरकेन प्रा लि. या संस्थेच्या माध्यमांतुन न्यु इंडिया इंशुरन्स कंपनी अहमदनगर व कोपरगांव कार्यालयाकडे त्याचा पाठपुरावा केला व तीन लाख रूपयांचा विमा क्लेम मंजुर करून घेतला.
सदर विमा रक्कमेचा धनादेश मयत उसतोडणी कामगार कै. विलास जिभाऊ पवार यांच्या वारस आई ताराबाई जिभाउ पवार व पत्नी श्रीमती योगिता विलास पवार यांना कारखाना कार्यस्थळावर नुकताच प्रदान करण्यांत आला. याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी. बी. शिंदे, उप मुख्य शेतकी अधिकारी चंद्रकांत वल्टे, सोपानराव निकम, शैलेश मुजगुले, केशवराव होन, अनिल सोनवणे, महेंद्र बच्छाव आदि उपस्थित होते.