कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर कोपरगाव शहर आणि तालुक्यात दोन वर्षांनंतर यंदा दसरा-विजयादशमी सण बुधवारी (५ ऑक्टोबर) पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव शहरात यावर्षी प्रथमच भव्य स्वरुपात महिषासुर दहन कार्यक्रम तहसील कार्यालयाशेजारील मैदानात बुधवारी रात्री आठ वाजता पार पडला. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिषासुराच्या पुतळ्यासह कोरोना, लंपी, वाढीव घरपट्टी कर आकारणी, जटील बनलेला पाणी, उखडलेले रस्ते, वाढती बेरोजगारी यासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कोल्हे म्हणाले, साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त म्हणून दसरा व विजयादशमी हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र व महत्त्वाचा सण मानला जातो. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा तर दुर्गामातेने महिषासुराचा वध करून विजय मिळवला तो दिवस दसरा व विजयादशमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी दसऱ्याच्या आधीचे नऊ दिवस आदिशक्तीचे पूजन केले होते आणि त्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्यांनी रावणाचा वध करून वाईटावर विजय मिळवला होता. तसेच महिषासुर नावाच्या राक्षसाच्या सेनेने जेव्हा देवदेवतांना त्रास देत उच्छाद मांडला होता तेव्हा दुर्गा देवीने महाकाली रूपात महिषासुराशी लढा दिला आणि नऊ दिवसांच्या लढाईनंतर दहाव्या दिवशी महिषासुराला ठार केले होते.
असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा, अन्यायावर न्यायाचा, पापावर पुण्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. समाजातील अपप्रवृत्तींचा, आपल्यातील दुर्गुणांचा नायनाट करून चांगले गुण आत्मसात करण्याचा आजचा दिवस आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आज कोपरगावात प्रतीकात्मक स्वरुपात महिषासुर दहन कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोना, लंपी आजाराचे संकट असो किंवा वाढीव घरपट्टी कर, जटील बनलेला पाणीप्रश्न, उखडलेले रस्ते, वाढती बेरोजगारी अशा एकनानेक प्रश्नांना आज कोपरगावची जनता सामोरी जात आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने महिषासुरासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्यांचे प्रतीकात्मक दहन केले. आगामी काळात आपण सर्वजण मिळून या सर्व समस्यांवर मात करूया, असे सांगून, आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघ समस्यामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली. संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या सात वर्षांपासून ‘जागवू या ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार अनेक नावीन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. सामाजिक एकता, वैद्यकीय मदत, युवा सशक्तीकरण, वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान नि:स्वार्थीपणे काम करत आहे.
कोपरगावच नव्हे तर राज्यात जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती कोसळते तिथे तिथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मदतीला धावून जातात. रत्नागिरी, चिपळूण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी तेथे जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानने अहमदनगर जिल्ह्यात सर्वप्रथम डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून कोरोनाग्रस्तांना मोफत औषधोपचार व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली, असे विवेक कोल्हे यांनी सांगितले.
कोपरगाव नगर परिषदेने वाढीव घरपट्टीचा बोजा मालमत्ताधारकांवर लादला होता. तालुक्याच्या आमदारांनी नागरिकांच्या हिताचा विचार न करता ही वाढीव घरपट्टी कमी करण्याऐवजी ४० टक्के घरपट्टीवाढीला मूकसंमती देऊन नागरिकांना आणखी संकटात टाकले होते. अशा वेळी भाजप, शिवसेना व रिपाइं (आठवले गट) ने वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी चार दिवस साखळी उपोषण केले. भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा युवा नेते विवेक कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्रशासनाने वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली आहे. कोल्हे परिवाराने वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळवून देत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, असे सांगून पराग संधान व राजेंद्र सोनवणे यांनी कोल्हे परिवाराचे आभार मानले.
प्रास्ताविकात सिद्धार्थ साठे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्यात पायल विजय भडकवाडे (महिषासुरमर्दिनी दुर्गा माता), पीयूष कैलास लोखंडे (राम), तेजल चंद्रकांत निर्मळ (सीता), श्रेयस अनिल कदम (लक्ष्मण), रेहान अश्रफ पठाण (हनुमान) हे बालकलाकार आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते. या बालकलाकारांसह २५ फुटी महिषासुराची प्रतिकृती तयार करणारे कलाकार कुणाल आमले यांचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेची भूमिका साकारलेल्या पायल विजय भडकवाडे यांच्या हस्ते महिषासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
याप्रसंगी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहण्यासाठी महिला व पुरुषांची तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी हा सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रित करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास न. प. तील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, विजय वाजे, माजी नगरसेवक अतुल काले, बबलू वाणी, बापू पवार, अशोक लकारे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, वैभव आढाव, प्रशांत कडू, राजेंद्र लोखंडे, रवींद्र रोहमारे, विवेक सोनवणे, सतीश रानोडे, विक्रमादित्य सातभाई, दीपक जपे, राजेंद्र गंगुले, दादासाहेब नाईकवाडे, सोमनाथ म्हस्के, किरण सुपेकर, राहुल सूर्यवंशी, रंजन जाधव, पप्पू पडियार,
गोपीनाथ गायकवाड, विजय चव्हाणके, गौरव येवले, गौरव आढाव, हाशमभाई पटेल, खालिकभाई कुरेशी, इलियासभाई खाटिक, सद्दामभाई सय्यद, हाशमभाई शेख, भैय्या नागरे, वासुदेव शिंदे, रोहित कनगरे, अर्जुन मोरे, स्वराज लकारे, सागर राऊत, कपिल सुरडकर, शंकर बिऱ्हाडे, सागर कोपरे, अभिजीत आबक, प्रभुदास पाठारे, अतुल दोरकर, रहीम शेख, संतोष साबळे, सोमनाथ अहिरे, रामचंद्र साळुंके, आशिष निकुंभ, कुणाल लोणारी, समीर सुपेकर, दत्ता कोळपकर, स्वराज सूर्यवंशी, मुकुंद उदावंत आदींसह भाजप, संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.