अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : अस्मानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. उन्हाळ्यात देखील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीदेखील या नुकसानीला न घाबरता झालेले नुकसान सोसून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील याचे योग्य नियोजन करा. अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी खरीप आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्या आहेत.

कोपरगाव तहसील कार्यालय येथे आ. आशुतोष काळे यांनी बुधवार (दि.१०) रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप आढावा व नियोजन बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्याबाबत कृषी विभागाला मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन त्यांनी सांगितले की, अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा पिकाचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आशा खरीप हंगामाकडे लागल्या आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. 

बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक बियाणे व खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी प्राथमिक तपासणी पूर्ण करून घेवून वारंवार तपासणी मोहीम राबवावी. खरीप हंगामात सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी आदी बियाणांची कमतरता जाणवणार नाही याची खबरदारी घेवून शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची खबरदारी  घ्यावी. शासकीय योजनांचा लाभ सर्व समावेशक राहील यासाठी प्रयत्न करा. सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून जनजागृती करा.

अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. टंचाई व आपत्ती व्यवस्थापन बैठकी बाबतच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत लवकरात लवकर बैठक घेवून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील आ. आशुतोष काळे यांनी सबंधित विभागाला यावेळी दिल्या.

     महाडीबीटी योजनेच्या थकीत अनुदानाचे प्रस्ताव तातडीने सादर करा.महाडीबीटी योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर वीज पंप मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.खरीप हंगामातील पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणे गरजेचे असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. – आ. आशुतोष काळे.

       यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, संगमनेरचे कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी, श्रीमती शोभा गोरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, राहुल रोहमारे, अनिल कदम, शिवाजीराव घुले, शंकरराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, खंडू फेफाळे, गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक संजय संवत्सरकर, भास्करराव सुराळे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, 

मुर्शतपुरचे सरपंच अनिल दवंगे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र खिलारी, गणेश घुमरे, गणेश घाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर, कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष सागर कवडे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, सर्व मंडल कृषी अधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शेतकरी मित्र, आत्मा कमिटीचे सदस्य, तालुका शेतकरी समन्वयक, कृषी विमा कंपनी प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.