थकबाकी पोचली १८ कोटी वर
शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : विविध मालमत्ता धारकाकडे शेवगाव नगर परिषदेची सुमारे १८ कोटीची थकबाकी असल्याने तीच्या वसुलीसाठी नगर परिषदेने व्यापक मोहीम राबविताना नवीन फंडा आमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यासाठी एप्रिलमध्ये मोठया थकबाकी धारकांची नांवे, त्यांची थकीत रक्कम शहराच्या चौकाचौकात फलक लावून जाहीर केली जाणार आहे.
शेवगाव नगरपरिषदेची मालमत्ता धारकांकडे मागील थकीत बाकी सहा कोटी पंधरा लाख रुपये तर चालू बाकी तीन कोटी २८ लाख अशी एकूण ९कोटी ४३ लाख रुपये येणे बाकी आहे. या शिवाय पाणीपट्टीची थकबाकी ७कोटी ७१ लाख रुपये अशी एकूण सुमारे १८ कोटीची थकबाकी आहे.
मालमत्ताधारक, भोगावठाधारक, जागा मालक, नळपट्टी आदी थकबाकी त्वरित भरावी, अन्यथा नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येईल अशी नोटीस नगर परिषदेने जाहीर केलीआहे. मालमत्ता कर थकबाकीमध्ये वैयक्तिक ग्राहका व्यतिरिक्त शासकिय, निमशासकीय, सहकारी संस्था देखील मागे नाहीत.
येथील कृषी कार्यालयाकडे २० लाख २४ हजार रुपये, दुय्यम निबंधक कार्यालय -एक लाख ५८ हजार ,पंचायत समिती १० लाख ७६ हजार तर पाणीपट्टीची थकीत रक्कम एक कोटी ९६ लाख, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालमत्ता कर १४ लाख ३९ हजार, दूरसंचार निगम ७ लाख ४७ हजार, तर पाणीपट्टी ५० हजार,. अहमदनगर जिल्हा दूध संघ ५लाख ६ हजार ,कृषी उत्पन्न बाजार समिती १६ लाख ४९ हजार तर तहसील कार्यालयाकडे मालमत्ता कराची २० लाख रुपये थकबाकी आहे.
पन्नास हजारावर लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरात नळ धारकांची संख्या ७ हजार७१५ आहे. यापेक्षा अनधिकृत नळ जोडणीचा आकडा अधिक मोठा असावा. मुख्य जलवाहिनीला परस्पर नळ जोडणी करून पाणी घेणाऱ्या मध्ये अनेक मोठ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
थकबाकी भरली नाही तर एप्रिल नंतर मोठ्या थकबाकीदारकांची नावे शहरातील चौकाचौकातील फलकावर प्रकाशित केली जातील. त्यामुळे आपली थकबाकी भरण्याबाबत नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सचिन राऊत व कर विभागप्रमुख डी.सी. साळवे यांनी केले आहे.