कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मणगाव येथे नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी आणि वारी येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ऊर्जा विभागाने कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जारी केला आहे. या दोन्ही विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी लागल्यामुळे ब्राह्मणगाव, वारी आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, अशी माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथील विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे या उपकेंद्रास जोडलेल्या गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषिपंप आणि घरातील विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नाहीत. विजेअभावी अनेक गावांमध्ये अंधार होतो. घरगुती वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना व्यवस्थित विद्युत पुरवठा होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
केवळ वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कृषिपंप बंद ठेवावे लागतात व पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वारी येथील विद्युत उपकेंद्राला जोडलेल्या अनेक गावांतील त्रस्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वारी येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता ३ एम.व्ही.ए. वरून ५ एम.व्ही.ए. इतकी वाढविण्याची मागणी केली होती. रवंदे येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी या उपकेंद्राशी जोडलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केली होती.
तसेच ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील गावांना खिर्डी गणेश व कोपरगाव येथील विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो; पण कमी दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील शेतकऱ्यांचे कृषिपंप व घरातील लाईट व्यवस्थित चालत नाहीत. विजेविना कृषिपंप बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जनतेची व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरण व महापारेषण कंपनीचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता, अहमदनगर विभागाचे अधीक्षक अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आदींना निवेदन देऊन वारी आणि रवंदे येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची तसेच ब्राह्मणगाव व धामोरी येथे नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी केली होती. स्नेहलताताई कोल्हे यांनी ब्राह्मणगाव व धामोरी येथे नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी सन २०१६ पासून राज्य सरकारकडे लावून धरली होती.
तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २६ एप्रिल २०१६, १८ एप्रिल २०१७ रोजी पत्रव्यवहार करून ब्राह्मणगाव येथील नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र उभारण्यास मंजुरी देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यावर बावनकुळे यांनी सदरील कामाचे अंदाजपत्रक सादर करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी ब्राह्मणगाव येथे नवीन विद्युत उपकेंद्रासाठी पाहणी केली.
तसा फिजीबिलीटी रिपोर्ट तयार करून तांत्रिक अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी (जा.क्र. उप. कार्य. अभि./कोप (ग्रा.)/२३८) (संदर्भ : १) आमदार कोपरगाव/२०१७-१८/पीए-२/११/११४/दि.१८-०४-२०१७, २) आमदार कोपरगाव/२०१७-१८/पीए-१/१३/१२०/दि.१८-०४-२०१७, ३) मु.अ./नाप/तांत्रिक/१/१८३६, ४) मु.अ./नाप/तांत्रिक/१/२२५५, दि.२२-०५-२०१७) पुढील कार्यवाहीसाठी संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला होता. त्यानंतर स्नेहलताताई कोल्हे यांनी २० एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे संगमनेरचे कार्यकारी अभियंता गोसावी यांना पत्र पाठवून सदर अंदाजपत्रकास मंजुरी देऊन ब्राह्मणगावच्या नवीन विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे काम रखडले होते.
नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्नेहलताताई कोल्हे यांनी या कामासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोल्हे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन ऊर्जा विभागाने ब्राह्मणगाव येथे नवीन ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी ४ कोटी ८५ लाख रुपये निधी मंजूर केला असून, या कामाचा कार्यारंभ आदेशही काढला आहे. या नवीन विद्युत उपकेंद्राच्या निर्मितीमुळे ब्राह्मणगाव व परिसरातील नागरिकांची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. शिवाय, चासनळी, रवंदे या वीज उपकेंद्रावर पडणारा विजेचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन या वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे. तसेच ऊर्जा विभागाने वारी येथील विद्युत उपकेंद्राच्या क्षमता वाढीसाठी ६० लाख रुपये निधी मंजूर केला असून, या निधीतून वारी विद्युत उपकेंद्राची क्षमता ३ एम. व्ही. ए. वरून ५ एम. व्ही. ए. करण्यात येणार आहे.
या कामाची वर्क ऑर्डरदेखील काढण्यात आली असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर वारी येथील विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील घरगुती व कृषिपंपांचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे. वारी आणि ब्राह्मणगाव येथील विद्युत उपकेंद्राचा शेतकऱ्यांच्या व जनतेच्या जिव्हाळ्याचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे वारी, ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले आहेत.