आईची केली तब्बल ७७ हजाराची नाणे तुला
शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : तब्बल पन्नास वर्षांपूर्वी सासऱ्याने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासारखा एखादा संस्मरणीय हरिनाम सप्ताह घालावा अशा शंभरी पार केलेल्या वृद्ध आजीच्या इच्छेखातर तीच्या नातवाने पूर्वीपेक्षाही काकणभर सरस आणि आजीच्या पसंतीला उतरेल असा अरवंड हरिनाम सप्ताह घातला.
याशिवाय वृद्ध आजीच्या समाधानासाठी नातवाने परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या आखेगावच्या श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के व त्यांच्या वृद्ध मातोश्री श्रीमती शहाबाई झिंजुर्के यांच्या वजनाच्या नाणे तुला करुन तुलेसाठी लागलेली तब्बल ७७ हजाराची रक्कम त्यांच्याच संस्कार केंद्राला भेट दिली. धन्य ती आजी आणि धन्य तो नातू अशा शब्दात परिसरात या आगळ्यावेगळ्या सप्ताहाची चर्चा होत आहे.
तालुक्यातील देवटाकळी येथील गयाबाई किसनराव मेरड ( वय १०१ ) हे वृद्ध आजीचे तर महेंद्र भाऊसाहेब मेरड हे आजीच्या संस्कारित नातवाचे नाव आहे. या संदर्भात आधिक माहिती अशी की, गयाबाई मेरड यांचे सासरे स्व. पांडुरंग मेरड यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी लाखावर खर्च करून गावात मोठा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता.
गयाबाईला आज देखील त्याचे भूषण आहे. ती परंपरा खंडित होऊ नये ही त्यांची अंतारिक इच्छा. मात्र त्यांच्या मुलाचे, भाऊसाहेबचे निधन झाले असल्याने आपली इच्छा त्यांनी नातू महेंद्र याचेकडे व्यक्त केली. आपण शंभरी पार केलीय, पिकलं पान केव्हा गळून पडल याचा नेम नाही. तेव्हा आपल्या हयातीत एखादा हरिनाम सप्ताह आपल्या दारी घडावा. या त्यांच्या इच्छेखातर नातवाने नुकताच देवटाकळी येथे ज्येष्ठ संत महंताच्या उपस्थितीत आतिशय सुरेख अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले.
यावेळी आजीच्या समाधानासाठी महेन्द्र यांनी परिसरातील जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजुर्के आणि त्यांच्या वृद्ध आई शहाबाई साहेबराव झिंजुर्के यांच्या वजनाच्या नाणे तुला देखील केल्या. त्यासाठी लागलेली चिल्लर नाणी मोजली असता ती रक्कम तब्बल ७७ हजार रुपयाची भरली. ही रक्कम आजी गयाबाईच्या हस्ते राम महाराजांच्या श्री. जोग महाराज संस्कार केंद्राला भेट दिली. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीची इच्छापूर्ती आपण करू शकल्याची भावना महेंद्र यांनी यावेळी भरभरुन व्यक्त केली ..