काळे कुटुंब नेहमीच तैलिक समाजाच्या पाठीशी – चैताली काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ :- सर्व समाजाशी कौटुंबिक नाळ जोडली गेलेल्या काळे परिवाराने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना सर्व समाजाला सोबत घेवून समान न्याय दिला असून तैलिक समाज देखील याला अपवाद नाही. ज्या-ज्यावेळी तैलिक समाजाने अडचणी व प्रश्न मांडले त्या-त्यावेळी त्या अडचणी व प्रश्न सोडवून काळे कुटुंब नेहमीच तैलिक समाजाच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी सांगितले.

कोपरगाव शहरातील श्री संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या सभागृहात संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व जेष्ठ महिला भगिनींचा सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी चैताली काळे, साधना लुटे, छाया क्षिरसागर, संगिता सोनवणे, रंजना गवळी, उषा सोनवणे, डॉ. दिपाली आचार्य, डॉ. कल्पिता वालझाडे, कविता चोथवे आदी महिला मान्यवर महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

पुढे बोलतांना चैताली काळे म्हणाल्या की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोक काळे यांचा आदर्श घेवून काळे परिवाराच्या समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना आ. आशुतोष काळे यांनी देखील सर्व समाजाचे प्रश्न सोडवून तैलिक समाजाच्या मागणीची दखल घेवून यांनी सभागृहाच्या कामाला सहकार्य केले आहे.

कोपरगाव शहरातील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे मंदिर व सांस्कृतिक भवनचे काम अतिशय सुंदर पध्दतीने झाले असून भविष्यात देखील आवश्यक ते सहकार्य नेहमीच राहणार असल्याचे सांगितले. हळदी कुंकू कार्यकमासमवेत महिला भगिनींना आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मार्गदर्शपर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी तैलिक महासभा महिला भगिनींचे कौतुक केले.

यावेळी डॉ.दिपाली आचार्य यांनी सर्व महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून महिलांनी सौंदर्याबाबत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे महिलांने आपले आरोग्य सांभाळुन आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. कल्पिता वालझाडे यांनी सर्व महिलांना मधुमेह, डायबिटीज या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय काय केले, कोणती पथ्ये पाळली पाहिजे, त्यासाठी कोणत्या गोष्टींची वर्ज्य केल्या पाहिजेत, या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

महिला विकास आर्थिक महामंडळाचे काम करणाऱ्या कविता चोथवे यांनी बचत गटाबाबत सविस्तर माहिती देवून राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने घेता येतो आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला काय करु शकतात, आर्थिक तरतूद कशा पद्धतीने उभी करु शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी जेष्ठ महिला भगिनींचा तसेच ‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात सहभागी होऊन राजेश्वरी सोनवणे यांनी पैठणी व सोन्याची नथ बक्षिस मिळवल्याबदल त्याचा श्री. संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टच्या वतीने सन्मान चिन्ह, ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नाली वालझाडे यांनी केले. सुत्रसंचलन प्रियंका सोनवणे यांनी केले तर आभार वृषाली सोनवणे यांनी मानले.

या प्रसंगी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषा सोनवणे, संगिता सोनवणे, राऊत, मोरे, ज्योती वालझाडे, उषा कवाडे, कल्पना मोरे त्याच बरोबर सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.