उपकारागृह व वाकडीच्या पाणी योजनेसाठी जमीन मुल्यांकन माफ करावे, आमदार काळेंची महसूलमंत्री विखेंशी चर्चा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्नाबाबत आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. यामध्ये कोपरगाव शहरातील उपकारागृहाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगाव मतदार संघात उपलब्ध असलेल्या शेती महामंडळाच्या जमीनी गावठाण विस्तारीकरणासाठी गावांना मिळाव्यात व वाकडी गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मुल्यांकन माफ करावे आदी विषयांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील उपकारागृहाच्या झालेल्या दुरावस्थेची महिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढे कथन केली. कोपरगाव शहराच्या उपकारागृहाची इमारत अनेक वर्षापूर्वीची जुनी असून सद्यस्थितीत हि इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. कोपरगाव शहरातील या उपकारागृहात कोपरगाव व राहाता तालुका तालुक्यातील आरोपींना ठेवण्यात येत आहे.

या कारागृहाची क्षमता कमी असून देखील एका बराकीत दहापेक्षा जास्त आरोपी ठेवले आहेत. त्यामुळे या उपकारागृहाची क्षमता वाढविण्यासाठी उपकारागृहाची नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. हा प्रस्ताव महसूल ई-८ या विभागाकडे प्रलंबित असून या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी यासाठी सबंधित विभागाला योग्य त्या सूचना देवून सहकार्य करावे.

कोपरगाव मतदार संघातील ७९ गावांमध्ये नागरिकांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत सोयी -सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नाही त्यामुळे सोयी सुविधांचा आभाव आहे. तसेच ज्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांना स्वत:ची जागा नसल्यामुळे हे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघातील ज्या गावांमध्ये शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे, अशा गावांना गावठाण विस्तारीकरण व सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी  शेती महामंडळाची जमीन मिळावी.

  तसेच वाकडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी आवश्यक असलेली स्वतःच्या मालकीची जागा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. साठवण तलावाकरीता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची गट नंबर २१६ मधील ४ हेक्टर ८८ आर जागा मिळणे बाबत प्रस्ताव दाखल केलेला असून साठवण तलावाला देण्यासाठी शेती महामंडळाने तयारी दर्शविली आहे.

परंतु या क्षेत्राची शेती महामंडळाने चालू बाजारभाव प्रमाणे येणाऱ्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने मागणी केलेली असून हि रक्कम १ कोटी ८७  लाख ३८ हजार एवढी आहे. वाकडी ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे वाकडी ग्रामपंचायत जमीन मूल्यांकनाप्रमाणे एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडकला आहे.

त्यामुळे सदरच्या जागेचे मूल्यांकन माफ करून वाकडी गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती आ. आशुतोष काळे यांनी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. तसेच अनेक गावात शेती महामंडळाच्या जागेवर मागील अनेक वर्षापासून भूमिहीन नागरिक वास्तव्यास असून अशा रहिवाशांच्या जागा नियमानुकूल करण्यात याव्यात अशी मागणी केली. सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आ. आशुतोष काळे यांना यावेळी दिली.