कोपरगाव प्रतिनिधी दि.१७ : मागच्या निवडणुकीच्या वेळी मी प्रचार सभेत म्हणालो होतो की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन त्याची दहशत अजूनही लोकांत आहेत.
पण मी ज्यावेळी म्हणालो होतो की, मी पुन्हा येईन तेव्हा राज्यातल्या जनतेने आम्हाला पुन्हा सत्तेत आणलं होतं पण काही लोकांनी आमच्याशी बेईमानी केली म्हणुन आम्ही सत्तेत आलो नव्हतो.
पण आमच्याशी ज्यांनी बेइमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेवूनच मी पुन्हा आलोय असे म्हणत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
नुकतेच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच १५ ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून भाषण करताना म्हणाले होते की, पुढील स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवण्यासाठी मी पुन्हा येईन यावर टीका करत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन या वाक्याची आठवण करून दिली होती.
त्याला आज कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळ परिसर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना पुन्हा येईन यावरून शरद पवार व शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, काही लोकांच्या पोटात वळवळ, मळमळ होते तर काहींच्यामध्ये तळमळ आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे हे होत आहे. शासन आपल्या दारी हा काकडी विमानतळ येथील १२ वा कार्यक्रम असल्याने विरोधकांना वाटते की ह्याचे १२ वाजतील.
पण विरोधकांना एकच सांगतो ३६ जिल्ह्यात असे कार्यक्रम होणार असुन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कार्यक्रमापुरता मर्यादित नसुन ३६५ दिवस लोकांच्या दारापर्यंत आमचं सरकार जात राहील, आमचं हे सरकार लोकांच्या दारापर्यंत जाणारं सरकार आहे बंद दाराआड बसणारे सरकार नाही.
फेस टू फेस बोलणार आमचं सरकार आहे. केवळ फेसबुकवर बोलणारं सरकार नाही. आम्ही जनतेपर्यंत पोहचून परिवर्तन घडवणारे आहे असे म्हणत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता फडवणीस यांनी निशाणा साधला.