कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ज्या पुलामुळे धामोरी गावचा चासनळी परिसराशी संपर्क तुटत होता व कोपरगाव चासनळी वाहतूक बंद होत होती. त्या प्रजिमा -४ वरील धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले असून केलेल्या पाठपुराव्याची महायुती शासनाने दखल घेवून या पुलासाठी तब्बल ४.४७ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.
धामोरी, ब्राम्हणगाव, येसगाव, खोपडी, जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा-४ हा चासनळी, मोर्वीस, वडगाव, बक्त्तरपूर, हंडेवाडी आदी गावातील नागरिकांना कोपरगावला जाण्यासाठी व धामोरी, मायगाव देवी व तसेच मोठी लोकसंख्या असलेल्या सांगवी भुसारच्या नागरिकांना चासनळी येथे जाण्यासाठी व लासलगाव, विंचूर, बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीला घेवून जाण्यासाठी अतिशय महत्वाचा मार्ग आहे.
कोपरगाव मतदार संघातील धामोरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून धामोरी शेजारी असलेल्या चासनळी येथे दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार व त्या ठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामुळे धामोरी, मायगाव देवी व तसेच धामोरीप्रमाणे मोठी लोकसंख्या असलेल्या सांगवी भुसार येथील नागरिकांचा सातत्याने चास नळी येथे धामोरी मार्गे सतत ये-जा असते.
पावसाळ्यात धामोरी, ब्राम्हणगाव, येसगाव, खोपडी, जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा-४ वरील धामोरी येथील गोई नदीवरील पूल पावसाळ्यात पाण्याखाली गेल्यानंतर हा मार्ग कित्येक दिवस बंद पडत असल्यामुळे चासनळी, मोर्वीस, वडगाव, बक्त्तरपूर, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, सांगवी भुसार आदी गावातील नागरिकांची मोठी अडचण होवून कोपरगाव-चासनळी वाहतूक ठप्प होत होती.
पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर अडचणीच्या वेळी चासनळी, मोर्वीस, वडगाव, बक्त्तरपूर, हंडेवाडीच्या नागरिकांना कोपरगावला जायचे असेल तर कोळपेवाडी मार्गे जावे लागत होते व धामोरी, मायगाव देवी, सांगवी भुसारच्या नागरिकांना चासनळी किंवा लासलगाव, विंचूर, बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीला घेवून जाण्यासाठी नासिक जिल्ह्यातील वाकद शिरवाडे मार्गे आठ ते दहा किलोमीटर जास्त अंतर जावे लागते. त्यामुळे वेळेबरोबरच आणि आर्थिक नुकसान देखील होते.
वाकद शिरवाडे येथील छोटा पूल जर पाण्याखाली गेला तर पर्यायच शिल्लक राहत नव्हता त्यामुळे नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागत होती. मागील अनेक वर्षापासून गोई नदीवरील पुलाचा प्रश्न प्रलंबित होता. जवळपास आठ ते दहा गावातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आमदार काळे यांनी दखल घेवून गोई नदीवरील पुलासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने नाबार्ड योजनेच्या माध्यमातून या पुलासाठी ४.४७ कोटी निधी मंजूर केला आहे.
मागील अनेक वर्षापासून नागरिकांची अडचण सुटणार असल्यामुळे चासनळी, मोर्वीस, वडगाव, बक्त्तरपूर, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, सांगवी भुसार गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. गोई नदीवरील पुलाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी महायुती शासनाने दखल घेवून या पुलासाठी ४.४७ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहे.