कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : विमान जसे उड्डाण घेवुन गतिमान होते आणि प्रवासाच्या अंतिम ठिकाणी जाते, तसे एमबीए व पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम गतिमानतेने अभ्यासुन ध्येया पर्यंत पोहचावे, मात्र यासाठी मन खुले ठेवुन नवनवीन संकल्पना आत्मसात कराव्या, आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसारच पुढे जा, आपले स्वप्न निश्चित पुर्ण होईल, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिला.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए व पीजीडीएमच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आदित्य बिर्ला कॅपिटलच्या उपाध्यक्षा डॉ. कविता राव, साऊथ आफ्रिकेतील दुर्बन युनिर्व्हसिटी ऑफ टेक्नॉलाजीच्या बिझिनेस स्कूलचे प्राद्यापक डॉ. रविंदर रेना, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. क्षिरसागर, संजीवनी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेट स्टडीजचे डायरेक्टर डॉ. विनोद मालकर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. मालकर यांनी सर्वांचे स्वागत करून एमबीए विभागाच्या प्रगतीचा आलेख मांडत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील सर्व विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यात यश आल्याचे सांगीतले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार पीजीडीएम हा कोर्सही चालु वर्षी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काळकर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता वाढवाव्यात, संभाषण कौशल्य सुधारावे, सहकार्य आणि टीम वर्कसाठी परस्परातील जाळे मजबुत करावे, आत्मविश्वास अंगी बाळगावा, चांगल्या ध्येयाचे स्वप्न बाळगावे.
डॉ. राव म्हणाल्या की, संजीवनी मध्ये शिक्षणाची संधी मिळालेले विद्यार्थी भाग्यवान आहेत. संजीवनी मधुन उद्योगांची गरज पुर्ण होत आहे. डॉ. रेना म्हणाले की, महाराष्ट्र हे राज्य देशातील प्रमुख राज्य असुन महाराष्ट्राने देशाला श्री छत्रपती शिवाजी महाराज, जग विख्यात क्रीकेटपटू सचिन तेंडूलकर, अनेक शास्त्रज्ञ, संत दिले. हा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी आपणही आपले कर्तृत्व सिध्द करावे. पोपट पक्षी खुप बोलतो. याउलट गरूड पक्षी शांत असतो परंतु गरूडाची भरारी सर्वात उंच असते. तद्वतच, विद्यार्थ्यांनीही शांत राहुन ज्ञान ग्रहण करून भविष्यात कर्तृत्वाची गगन भरारी घ्यावी.
डॉ. कोल्हे यांनीही संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सर्व नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून सांगीतले की, २०१० मध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० होती. आता ती २४० झाली आहे व हे सर्व प्रवेश पुर्ण क्षमतेने भरतात. याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते. माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा उत्कृष्टतेचा वसा संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे समर्थपणे पुढे नेत आहे.
कोणतेही यश हेअकस्मात मिळत नाही. तर त्यासाठी सातत्य ठेवावे व यशस्वी व्हावे, असे डॉ. कोल्हे शेवटी म्हणाल्या. नविन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू होवुन २ महिने झाले. या दोन महिन्यांच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये कसे सकारात्मक बदल झाले, याचे कथन काही विद्यार्थ्यानी केले. तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या सिनिअर विद्यार्थ्यांचा तसेच नव्याने स्थापन झालेल्या विविध मंच्यावर प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.