ऊसाला ३१०० रुपये भाव दया, अन्यथा ऊस तोड बंदचा ईशारा – स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेवगाव प्रतिनिधी, दि.०७ : चालु वर्षी उसाला प्रति टन ३१०० रु. भाव द्यावा व मागील वर्षाचे ३०० रु. दिवाळीच्या अगोदर सर्व संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात लगेच जमा करावेत. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली असून १० नोव्हेबर पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बुधवार दि.१५ पासून ऊस तोड तसेच ऊस वाहतूक बंद करण्यात येईल. असा इशारा साखर कारखानदार व प्रशासनाला दिला आहे. या संदर्भाचे सविस्तर निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखानदारांना साखर व अन्य उपपदार्थापासून गेल्या वर्षी प्रति टन ५ हजार ४०० रु. इतके उत्पन्न मिळाले असून या वर्षी देखील चांगला भाव मिळणार असल्याने चालू गळीत हंगामासाठी ऊसाला प्रति टन पहिली उचल ३१००/- रु. मिळावी व मागील हंगामातील साखरेतील व उपपदार्थांमधील वाढलेल्या दराचा फरक म्हणून ३००/- रु. दिवाळीच्या सणासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर लगेच वर्ग करावेत. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून कारखानदार व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे.

परंतु ऊस कारखानदारांनी अद्याप त्याची दखल घेतली नाही. शेतकऱ्यांमध्ये त्याचा मोठा रोष आहे. त्यात चालू गाळपासाठी जाणाऱ्या ऊसाचा भाव जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याचा उद्रेक होऊ नये. म्हणून चालू हंगामातील ऊसाची पहिली उचल ३१०० रुपये १० नोव्हेंबरच्या आत जाहीर करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी बुधवार दि.१५ नोव्हेबर पासून ऊसतोड व वाहतूक बंद करतील.

मागील सलग दोन वर्षांपासून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यामुळे कारखानदारांना मोठा लाभ झालेला आहे. त्यातच साखर, मळी, इथेनॉल, मॉलिसिस व वीज यांचे दर वाढलेले आहेत यामधून मोठ्या प्रमाणात कारखानदारांना लाभ झाला आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला गेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकयांनी हा निर्णय घेतला आहे. असे शेवटी नमुद करण्यात आले आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, मच्छिंद्र आरले जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, तालुका अध्यक्ष मेजर अशोक भोसले, तालुका पक्ष अध्यक्ष प्रशांत भराट, शहराध्यक्ष अमोल देवढे, युवक अध्यक्ष हरिभाऊ कबाडी, दादासाहेब पाचरणे, विकास साबळे  नानासाहेब कातकडे, नारायण पायघन, अंबादास भागवत व शेतकरी उपस्थित होते.