कोपरगाव प्रतिनिधी, दि.९ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच कोपरगाव येथे दौरा करून कोल्हे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी सोयरे आणि विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. कोल्हेंबाबत नाव न घेता पातळी सोडून विखेंनी गाळ काढण्याची भाषा केली व आमदार काळे यांची गॅरंटी मी घेतो आगामी काळात त्यांच्या पाठीशी असल्याचे भाष्य केले. यावर राहता मतदारसंघात मात्र उलट प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी विखेंनी बाहेर जाऊन गॅरंटी घेणे सोडावे आधी स्वतःची गॅरंटी आगामी राजकीय वाटचालीत राहिली नाही याचा विचार करावा अशी खरपूस प्रतिक्रिया संजय गिधाड यांनी दिली आहे.
नेहमीच जिरवा जिरविचे राजकारण करण्यात रस असणारे कुटील राजकारणी म्हणून विखेंची ओळख आहे. कधीही ज्याच्या सोबत ते असतात त्याच्या बाबतीत घात होतो. दमबाजी, दडपशाही या विरोधात राहता तालुक्यातील जनतेने श्री गणेश कारखान्यात आगामी विधानसभेची चुणूक दाखवली आहे. आपलेच जहाज जनता पलटी करणार आहे याची भीती कदाचित विखेना अस्वस्थ करत असल्याने त्यांचा तोल जातो आहे.
गणेशच्या निकालाने विखे पुरते कामाला लागले असून विवेक कोल्हे यांचा धसका त्यांनी घेतला आहे. साखर वाटप, देवदर्शन, अरेरावी वरून भाऊदादा सुरू झाले. पन्नास वर्षे सत्ता भोगून कधी राहता तालुक्यातील युवक यांना दिसला नाही. मात्र आता कोल्हे यांनी एम आय डी सी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न केले आहेत या प्रयत्नांना यश आले तर आपल्याला श्रेय मिळणार नाही या भीतीने घाई घाईत विखेंनी एमआयडीसी आणि रोजगार विषयात उडी घेतली.
राहता तालुक्यात आजवर अनेकांची वाताहत करणारे मोठ्या मनाने रोजगार आणतील यावर कुणाचा विश्वास बसत नाही. त्यामुळे अपरिहार्यता म्हणून विवेक कोल्हे या युवकावर जनमानसात निर्माण झालेल्या विश्वासाने विखेना हे सर्व करने भाग पडले, अशी जोरदार चर्चा राहता मतदारसंघासह जिल्ह्यात सुरू झाली आहे. येत्या काळातही विखेंनी बाहेर जाऊन काड्या करने यात वेळ घालवने आणि मतदारसंघ आपली मालकी आहे, मतदार आपल्या दावणीला आहेत असा समज करून गृहीत धरू नये.
मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी यासह दैनंदिन असंख्य समस्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ हम करे सो कायदा असे करून लोकांना स्वतःच अडचणीत आणून नंतर आपल्या दावणीला बांधून स्वार्थी राजकारण करण्याची त्यांची सवय मोडण्यासाठी जनता वाट पाहून आहे असे सूतोवाच संजय गिधाड यांनी केले आहे.