जिद्द, चिकाटी व मेहनतीने स्वतःला सिद्ध करा, यशस्वी व्हाल – अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : समाधानी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. न्यूनगंड व अभिमान ठेवू नका. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिरातुन नेतृत्वगुणांच्या विकासाबरोबर अनेक नीती मूल्यांचे शिक्षण मिळते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सर्वसामान्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले.

सहकार महर्षी गणपत रभाजी औताडे यांनी पोहेगावात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयासाठी जमीन दान देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून दिले. आज त्यांचा वारसा घेऊन उच्च शिक्षणाची दरी कमी होण्यासाठी विशेष करून ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षण मिळण्यासाठी नितीन औताडे यांनी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करून सामाजिक जबाबदारी स्वीकारली आहे.

विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनतीची खूप गरज आहे. यातून स्वतःला सिद्ध करा जीवनात निश्चित यशस्वी व्हाल असे प्रतिपादन अहमदनगर उत्तर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सहकार महर्षी कै. गणपत रभाजी औताडे सामाजिक व शैक्षणिक मंडळ संचलित पोहेगांव येथील हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोपप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते होते. यावेळी हिंदुहृदयसम्राट मान.बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे संस्थापक नितीन औताडे, प्राचार्य डॉ शांतीलाल जावळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब राहणे, ॲड शिवाजी खामकर, सरपंच जया माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, अशोक म्हाळसकर, साईनाथ रहाणे, देवचंद खामकर, अमोल खामकर, श्रीमती पूजा गायकवाड, प्रकाश सरवार, हौशीराम पाडेकर, जालिंदर कोल्हे, शिबिर कार्यक्रमाधिकारी प्रा.रवींद्र गायकवाड, प्राध्यापिका बी एस गांधीले, डी एस वाघमारे, ग्रामसेवक अमोल निकम अदी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक नितीन औताडे यांनी सांगितले की महाविद्यालयीन शिक्षणाची गळती कमी होण्यासाठी व ग्रामीण भागातील मुला- मुलींना उच्च शिक्षण मिळण्यासाठी हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाची स्थापना केली. खा. सदाशिव लोखंडे व शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते   

यांनी या महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी खूप प्रयत्न केले. महाविद्यालयात 258 विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेच्या तीन एकर जागेवर 50 हजार स्क्वेअर फुट इमारतीचे ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू आहे. भविष्यात या महाविद्यालयातून स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे नितीन औताडे यांनी सांगितले. तर कैलासबापू कोते यांनी सांगितले की शिबिरातुन चांगले संस्कार मिळतात. चांगले नागरिक होण्यासाठी हजारो मैलाचा टप्पा पार करावा लागतो.

कॉलेज जीवन हे हसण्याचे खेळण्याचे आहे. मात्र, आपल्या जीवनाचा सैराट होऊ देऊ नका. अतिरिक्त मोबाईल वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. व्हाट्सअप, फेसबुक व इंस्टाग्राम मधून बाहेर पडा. आपल्यामुळे आई-वडिलांची मान खाली होणार नाही याचे गांभीर्य जपा. हे सर्व जर पाळले तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही असे त्यांनी सांगितले. प्राचार्य शांतीलाल जावळे यांनी वेस सोयगाव परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन बी. एस. गांधीले यांनी केले, तर आभार आर. बी. गायकवाड यांनी मानले.