वाकडीसह गणेश परिसर सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्नशील – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : वाकडी गावासह गणेश परिसरातील शेतकरी व जनतेचे विकासाचे प्रश्न सोडवून या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. वाकडी येथील ग्रामपंचायतने आज विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करून विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे. वाकडी हे भौगोलिकदृष्ट्या मोठे गाव असून, या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लावून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली. 

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी (२० जानेवारी) युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते,

वाकडी गावच्या सरपंच रोहिणी बाळासाहेब आहेर, गणेश कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजी लहारे, संचालक भगवंत टिळेकर, गंगाधर डांगे, संपत चौधरी, नानासाहेब नळे, संपत हिंगे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, आलेश कापसे, अरुंधती अरविंद फोफसे, विष्णुपंत शेळके, भीमराज लहारे, गोरक्षनाथ यलम, विठ्ठल शेळके, अनिल शेळके, बाळासाहेब आहेर, संजय शेळके, तात्यासाहेब गोरे, वसंत हसे, संपत लहारे, भागवत शेळके, नवनाथ शेळके,

उपेंद्र काले, ग्रा. पं. सदस्य अनिल गोरे, अमोल शेळके, कैलास लहारे, कल्पना सुनील लहारे, सविता राजेंद्र शेळके, गंगाधर नारगिरे, मंगल सोन्याबापू आहेर, बी. डी. शेळके, संजय पवार, डॉ. सौ. गोगरे, यशवंत बधे, विष्णुपंत लहारे, सुभाष जाधव, संजय जाधव, बाळासाहेब जाधव, सुभाष कापसे, सचिन आहेर, बाळासाहेब लांडे, प्रकाश लांडे, महेश लांडे, प्रवीण शिंदे, नितीन साबदे, ग्रामसेवक सोनवणे यांच्यासह सोसायटीचे संचालक, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी गणेश परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती व त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन विवेक कोल्हे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे, बाळासाहेब थोरात व स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव व राहाता तालुक्यातील जिरायती भागात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी आपला शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते व शेतकरी यांनी सामूहिक लढा उभारण्याची गरज आहे.

गोदावरी कालव्यांना उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्नेहलता कोल्हे यांनी आमदार असताना वाकडी व परिसरात डांबरी रस्ते, श्री हनुमान, लक्ष्मी आई, साई मंदिरात सभामंडप जलसंधारण आदी अनेक विकास कामे झाली आहेत. त्यांनी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जागा मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला व त्यामुळे पुणतांबा व कोकमठाण येथील पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जागा मोफत मिळून तेथील पाणी प्रश्न सुटला. वाकडी गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम स्नेहलता कोल्हे यांच्या माध्यमातून मार्गी लावून पाण्याचा प्रश्न निश्चितच सोडविला जाईल. 

ते म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखाना चालविताना विरोधक विविध मार्गांनी अडथळे आणत आहेत, पण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आपण ‘गणेश’ च्या संचालक मंडळाच्या मदतीने हा कारखाना चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच कारखाना १ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करणार आहे. येत्या एक महिन्याच्या आत गणेश कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिले जाईल. गणेश परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.

युवकांना सध्या रोजगाराची आवश्यकता असून, एमआयडीसी, शेती सिंचन, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासनदरबारी सतत पाठपुरावा करून सोनेवाडी व सावळी विहीर परिसरात शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी मंजूर करवून आणली. या नव्या औद्योगिक वसाहतीमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटून विकासाला अधिक गती मिळणार आहे.

महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले तर उद्रेक होऊ शकतो म्हणून वाकडी येथील नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांनी व गणेश साखर कारखान्याच्या संचालकांनी महिलांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांच्या विकासाला प्राधान्य देत अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. देशात ८० कोटी लोकांना सरकार मोफत धान्य देत आहे. जनतेला रोटी, कपडा आणि मकान या मूलभूत सुविधा पुरविण्यावर केंद्र व राज्य सरकार भर देत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आदी योजनांच्या माध्यमातून बेघरांना सरकार घरकुल उपलब्ध करून देत आहे. मूलभूत सुविधांबरोबरच पाणी, वीज, रस्ते, गटारी व सांडपाण्याचे व्यवस्थापन याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष दिले पाहिजे. सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून गावचा विकास करावा. तरुणांनी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून उन्नती साधावी, असे आवाहन कोल्हे यांनी केले. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विठ्ठल शेळके, उपेंद्र काले आदींची भाषणे झाली.