तब्बल ४७ वर्षापूर्वीच्या बॅचच्या ज्येष्ठांनी आनंदाची केली लयलुट

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयातील  (तत्कालीन “शेवगाव इंग्लिश स्कूल ” मधील ) तब्बल ४७ वर्षापूर्वीच्या १९७८ च्या इयत्ता १० वीच्या गुंफण मैत्रीची या ग्रुपचे गेट-टुगेदर शिर्डी येथे नुकतेच पार पडले. साठी केव्हाच ओलांडून निवृत्तीकडे झुकत असणाऱ्या आजच्या ज्येष्टांनी गेल्या पाच वर्षापासून आपले सर्व उद्योग व्यवसाय बाजूला सारून एकत्र येऊन निर्भेळ आनंद लुटण्याची परंपरा जोपासली आहे.

बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात, तो सुखाचा काळ आपल्या मित्र-मैत्रिणींमुळेच सुखाचा होतो. बालपणी असणारी निरागसता, ते निरपेक्ष प्रेम, ना गरीब -श्रीमंत भेद, ना  जाती धर्माचे अडथळे, ना मार्काची – नंबरची जीवघेणी स्पर्धा, उत्तम गृहिणी, अधिकारी, उद्योजक, नोकरदार, व्यावसायिक निरनिराळ्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठलेले सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी एकत्र आले होते,  कोणाला गर्व होता ना अहंकार.

शिर्डी येथील रहिवासी व गुंफण ग्रुपचे सदस्य पंढरीनाथ शेकडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी साईबाबांची महती, श्रद्धा व त्यांना आलेली बाबांची प्रचिती तसेच संस्थानात नोकरी करत असताना संपर्कात आलेल्या सेलिब्रेटीजचे मजेशीर  किस्से सांगितले.

या निवासी संमेलनात हुरडा पार्टी, बोटिंग, स्विमिंग, रेन डान्स, रोपवे, उघड्या जीप व बैलगाडीतून सफर, झोके याचा सर्वांनी आस्वाद लुटला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या हास्य संमेलनात डॉ. मेधा कांबळे, हरिश्चंद्र नजन, ज्येष्ठ उद्योजक मुकुंद कुलकर्णी, डॉ. वृंदा कुलकर्णी, बाबूलाल बंब, रमेश गवळी, शर्मिला खिरोडे, सुनीता वेलदे, जयश्री भारदे, चक्रधर रांधवणे,भागचंद नांगरे यांनी हशा व टाळयांच्या गजरात विविध विषयावर विनोदी कविता सादर केल्या.

दुसऱ्या दिवशी मैदानी तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी चक्रधर रांधवणे यांनी केलेली मिमिक्री  ही संमेलनाचे  आकर्षक ठरली. रोजचे इस्त्रीचे चेहरे घरी ठेवून आलेले हे सर्वजण या ठिकाणी दहावीचे विद्यार्थी होऊन चैतन्य व आनंद लहरींचा आस्वाद घेत होते. अगत्य कृषी पर्यटन, सावळे विहीर यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात सर्वांचे स्वागत करण्यात आले.  पद, प्रतिष्ठा, अभिमान सोडून सर्वांनी ह्या तालावर नृत्याचा ठेका धरला.

भोजनात विविध प्रकारचे मेनू असल्याने सर्वांनी आपले व्याधी व पथ्य सोडून त्याचा पुरेपूर आस्वाद घेतला. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या संमेलनात एकमेकांची सुखदुःखे जाणून घेतली जातात.  ग्रुपच्या वतीने कोणत्याही सदस्याला आलेली अडचण, संकट याची दखल घेतली जाते. व मदतही केली जाते.

केदार बाहेती, सुभाष राठी, माणिक (बंडू ) म्हस्के, रमेश जाधव, बादशाह शेख, संध्या लिमये, सुनीता शेळके, श्रीनिवास तिवारी, इलियास सय्यद, सुनंदा गुगळे, शिला करंजे, माधुरी जाधव, मंदाकिनी शेकडे आदी सदस्य  उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता साईबाबांचे दर्शन व प्रसाद घेऊन तसेच वर्षभर पुरेल अशी ऊर्जा घेऊन अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने पुन्हा भेटण्याचा निर्णय घेऊनच करण्यात आली. 

Leave a Reply