कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : रोबोटिक्स हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सोमैया विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत मुंबई मधील शीव येथील के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील रोबोटिक सेलच्या विद्यार्थ्यांनी सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मिडीयम, कोपरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना दोन दिवसीय रोबोटिक प्रशिक्षण देऊन सोमैया विद्याविहार ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. शांतीलाल सोमैया यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना एक आगळी वेगळी आदरांजली वाहिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोमैया विद्याविहार शिक्षण समूहाचे अध्यक्ष समीर सोमैया हे नेहमीच प्रयत्नशील असतात. पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमैया यांची दूरदृष्टी स्वतःतही बाळगणे व त्यांच्या स्वप्नातील सामाजिक उपक्रम साकार करणे तसेच जे काही चांगले समाजाकडून आपल्याला मिळाले आहे ते असंख्य पटीने पुन्हा समाजाला परत देणे यासाठी समीर सोमैया हे सतत कार्यशील असतात.
“न मानुषात परोधर्म” याचे ते प्रत्यक्षपणे पालन करतात. त्यांची ही प्रेरणा घेऊनच आम्ही आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, ते शिकण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षण आयोजित केल्याचे प्रशिक्षणाच्या आयोजिका व प्राध्यापिका डॉ. वैशाली वाढे यांनी सांगितले.
आज जग वेगाने बदलत आहे. स्मार्ट सिटी, औद्योगिक ऑटोमेशन, कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञान, आणि वैद्यकीय रोबोटिक्स ही आजची गरज बनली आहे. या सर्वांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा आहे. जर ग्रामीण भागातील विद्यार्थी हे तंत्रज्ञान शिकून घेत असतील, तर ते आपल्या देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचा आधार ठरतील असेही त्या म्हणाल्या.
शालेय शिक्षणात रोबोटिक्सचा समावेश केल्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर समस्यांचे व्यावहारिक निराकरण कसे करायचे हे शिकतात. अशा प्रकारचे ‘STEM एज्युकेशन’ त्यांच्यात विचार करण्याची क्षमता निर्माण करते, असे सोमैया विद्या मंदिर, लक्ष्मीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक मारुती धायतडक यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाचे आयोजन लक्ष्मीवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोमैया स्पोर्टस अकॅडमी येथे करण्यात आले होते. हे प्रशिक्षण देण्यासाठी के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई या संस्थेतील रोबोटिक सेलचे अणुविद्युत आणि दूरसंचार या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी कु. आर्या भाइक, आकाश अध्यापक, श्रीराम फासे, पार्थ कच्छाडिया आणि जय मानेक यांनी पुढाकार घेतला.
या उपक्रमास सोमैया विद्याविहार शिक्षण समूहाचे अध्यक्ष समीर सोमैया, गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड चे महाव्यवस्थापक सुहास गोडगे आणि संपूर्ण सोमैया विद्याविहार ट्रस्ट व्यवस्थापन यांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमासाठी के जे सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक सुन्नपवार, मुख्याध्यापक मारुती धायतडक आणि वाकचौरे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.