कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणा-या पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेला २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात ९० लाख २७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहातील कर्मचारी तसेच कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे-मोठे व्यावसायिकांना स्वत:चे छोटे-मोठे व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे. या दूरदृष्टीतून माजी खासदार कर्मवीर काळे साहेबांनी सुरु केलेली हि पतसंस्था साहेबांच्या आदर्श विचारांच्या तत्वावर प्रगतीच्या शिखराकडे झेप घेत आहे.
दिवसेंदिवस संस्था प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असतांना थकबाकीचे प्रमाण २.८९ टक्के तर एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के राखले आहे. संस्थेवर असलेल्या दृढ विश्वासामुळे ठेवीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ३७.९७ कोटी इतक्या ठेवी तर २४.३५ कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे.
संस्थेचे वसूल भाग भांडवल रू.९६.७४ लाख इतके आहे. गुंतवणूक २७.४५ कोटी आहे. संस्थेला मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ठ व उल्लेखनीय कामगिरी बद्दल बँको ब्ल्यू रिबन पतसंस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती देवेन रोहमारे यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगती करीत आहे.
प्रगतीची हि परंपरा व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने यापुढेही अशीच सुरु ठेवणार असल्याचे संस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे यांनी सांगितले आहे.