शेवगाव प्रतिनिधी, दि.२६ : गावातील यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे श्रीफळ वाढवून मचावरून खाली उतरत असतांना महिला सरपंचाचा गावातीलच टारगटाने विनयभंग करून सरपंच महिलेस व तीच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भाची फिर्याद महिला सरपंचाने शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५) रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली.
यासंदर्भात शेवगाव पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील थाटे येथे यात्रेनिमित ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या महिला सरपंच म्हणून मी शितल परमेश्वर केदार (वय ३२) मंचावर जाऊन गुरुवारी रात्री साडेनऊला श्रीफळ वाढवून औपचारिक उद्घाटन केले.
त्यानंतर आम्ही स्टेजवरून खाली उतरत असतांना गावातीलच सुधीर निवृत्ती जायभाये याने पाठीमागून येऊन मला कवटाळून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व धक्का बुक्का करून ढकलून दिले.
त्यावेळी तेथे असलेल्या भागवत निवृत्ती जायभाये, ज्ञानेश्वर भाऊ साहेब केदार, तुकाराम भाऊसाहेब केदार, संतोष अंबादास केदार, पांडूरंग माणिक केदार, संभाजी अंबादास केदार, प्रमोद रोहिदास केदार, देवेद्र बाळू जायभाये, महेश पांडूरंग केदार सर्व रा.थाटे यांनी मला व माझे पती, परमेश्वर केदार यांना घाणघाण शिवीगाळ करून तुम्हाला सरपंच झाल्यापासून खुप जास्त झाले आहे. तु आमच्या पुन्हा नादी लागलात तर तुला व तुझ्या पतीला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.