शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : मोदी यांचे काम अस्वस्थ करणारे आहे. भाजपा सरकारची भूमिका घटना डावलून हुकूमशाही कडे वाटचाल करणारी आहे. लोकशाही उध्वस्त होत असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र राहावे लागेल. असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केले.
महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ रविवारी शेवगावात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रताप ढाकणे, महेबुब शेख, राजेंद्र फाळके, अशोक गायकवाड, ऍड सुभाष लांडे, राजेंद्र दौंड, अभिषेक कळमकर, राजेंद्र दळवी, रामदास गोल्हार, नितीन काकडे, हरिष भारदे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत, आम्ही काम करताना राजकारण आणत नाही. या निवडणुकीत जे राजकारण पाहिले नाही, ते राजकारण आता पाहत आहोत. गुजरात मधील शेतकऱ्यांना त्यांचा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल आनंद आहे. ते आमचे दुश्मन नाहीत. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय घोड मारलं. ज्या शेतकऱ्याला दोन पैशाचा फायदा होत होता, त्यावर बंदी घातली.
यावेळी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील रासने यांनी पक्ष प्रवेश केला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांची मंचावरील उपस्थिती लक्षणीय ठरली. तर अपक्ष उमेदवार योगिता लोळगे यांनी लंके यांना जाहीर पाठिंबा दिला.
हे सरकार काळ्या आईचे ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचे सरकार नाही. ज्यांच्या हातात दहा वर्ष सरकार होते. त्यांनी नोटा बंदी केली. त्या बदलण्यासाठी जनतेला लाईनीत उभे केले. यावेळी सातशे लोक मृत्यू पावले. करोना सारखी परस्थिती असताना लंके यांनी ३५ हजार लोकांना जीवदान दिले. लोकशाही मध्ये टीका करण्याचा मुलभूत अधिकार आहे. मात्र, भाजपा सरकारने टीका करणाऱ्यावर कारवाई केली, रांची मध्ये टीका झाली तर तेथील मुख्यमंत्री तुरुगात टाकले. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शिक्षण आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले. मात्र, विरोधक म्हणून त्यांनाही तुरुंगात टाकले. सत्तेचा गैरवापर करणे हेच यांचे काम आहे. प्रश्न सोडण्या ऐवजी अटक करण्याची भूमिका मोदीनी सरकारने घेतली.
स्थानिक प्रश्नांना हात घालतांना, शेवगावमध्ये मिनी एमआयडीसी आणता येईल असा प्रयत्न करू. ताजनापुरचे पाणी देण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. नऊ गावाना पाणी मिळावे म्हणून अनेकांनी माझी भेट घेतली, हा प्रश्न आम्ही सोडवू. तसेच शेवगाव पाथर्डीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावले जातील. विकासाला गती द्यायची गरज आहे. लोकशाही मध्ये लोकांनी निर्णय घ्यायचा असतो. मात्र, गेल्या कित्येक वर्षात कोणत्याच निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.
पोलीस मध्ये मध्ये येत असल्याने लंके म्हणाले, अवो डीपार्टमेंट जरा बाजूला व्हा काळजी करू नका. आम्ही संरक्षण करण्यास समर्थ आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना पाहू द्या, आमच्या बरोबर दिसतुम्ही किती काम करता पाहत आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याने दम देता सर्व हिसाबा तेरा तारखेला करू.
लोकांना लोकशाहीचा अधिकार गाजवू द्यायचा नाही. अशी त्यांची घटनाबाह्य भूमिका आहे. ते होऊ द्यायचे नसेल तर आपण लंके यांच्या सारखे उमेदवार निवडून द्यायला हवेत. मोदी सरकारचे अधिकार वाढवण्यासाठी संविधानात घटनेत बदल करण्याची भाषा सुरू आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, जनतेचा उमेदवार कसा असतो ते आपण पाहत आहोत. रात्री दोन तीन वाजे पर्यंत लोक लंके साठी जागे राहतात. काय जादू आहे कळत नाही. म्हणून त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत.
सर्वसामान्यांच्या व्यथा दूर करण्याची धडपड त्यांच्या मध्ये आहे. आदर्श लोकप्रतिनिधी आहे. पुढारी कुठे असतील त्यांना तिथेच राहू द्या. विखे यांचा नामोल्लेख टाळून त्रास देणे त्यांचा पिंड आहे काळजी करू नका मतदान करा. आता सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पुढे आला आहे. तो आपल्या घरातील मुलगा आहे. लढाई मोठ्या शक्ती बरोबर आहे. त्यांचे गर्वहरण करायचे आहे.
निलेश लंके म्हणाले, देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, ते संविधान वाचवण्यासाठी निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही. शेतकरी मरतोय, मात्र सरकार काही करत नाही. पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवले त्यांनी पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा एकही प्रश्न उपस्थित केला नाही.
माझ्यावर एकदा विश्वास टाका, आपल्याला अभिमान वाटेल असे काम करून दाखवील. शेवगाव भागात पाणी प्रश्न गंभीर आहे. विकास नाही, काम नाहीत अशी अवस्था झालीय. समोरच्या माणसाच्या पाया खालची वाळू सरकली म्हणून डमी लंके उभा केला आहे. मात्र, निवडणूक आपणच जिंकणार असे लंके म्हणाले.