पंचायत समितीत गुणवंत बालकांच्या हस्ते ध्वजारोहण करून राबविला स्तुत्य उपक्रम
शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : बुधवार दिनांक 1 मे ला महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन शेवगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा शेवगाव तहसील कार्यालयात आमदार मोनिकाताई राजळे यांचे हस्ते तहसीलदार प्रशांत सांगडे, राहूल गुरव तसेच नायब तहसीलदार, विभाग प्रमुख व नागरिकांच्या उपस्थित ध्वजारोहण करून साजरा करण्यातआला. तसेच शेवगाव ग्राम पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, सा. बां. विभाग आणि विविध शैक्षणिक संस्थासह तालुक्यातील ९४ ग्राम पंचायती मध्ये देखील महाराष्ट्र दिनानिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शेवगाव पंचायत समिती मध्ये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेल्या तालुक्यातील आठ हुशार मुला मुलींचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ही संकल्पना शेवगाव पचायत समितीचे उपक्रमशील गट विकास अधिकारी राजेश कदम यांचे संकल्पनेतून राबविण्यात आली.
नवोदय विद्यालयासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून तालुक्यातील आठ मुले-मुली पात्र गुणवत्ता यादीत झळकली आहेत. शेवगाव तालुक्याचे नाव त्यांनी राज्यात पोहोचविले आहे या गुणवंताचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि या लहानग्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या हस्ते १ मेचे ध्वजारोहण करण्याचा उपक्रम गटविकास अधिकारी कदम यांनी राबविला. त्यासाठी या विद्यार्थ्यांना सोमवारच्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले.
सोमवारी सकाळी ७.१० वा. १ मे च्या ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसन्न राठोड, आराध्या घुले, अर्पिता कीर्तने, जोहन बागवान, आर्या राठोड हे पांच सुकळी येथील विद्यार्थी आणि पिंगेवाडीची अन्वी झरेकर, बालमटाकळीचा समृद्ध पवार तर वरुरची अर्पिता पाचारणे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुला मुलींना त्यांचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने त्यांना पंचायत समितीच्या वतीने पाहुणे म्हणून या कार्यक्रमास पाचारण करण्यात येऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेगळ्या सन्मानामुळे विद्यार्थ्यां बरोबरच त्यांचे पालक देखील सुखावले. गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी, ही गुणवंत मुले देशाचे सुजाण नागरिक बनावेत. भावी काळात त्यांना यापेक्षाही अधिक घवघवीत यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा दिल्या. कल्याण मुटकुळे यांनी सुत्र संचलन करून आभार मानले.
यावेळी डॉ संकल्प लोणकर, शैलजा राऊळ, दादासाहेब शेळके, सचिन भाकरे, जयवंत शिंदे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. येथील सेवानिवृत्त सैनिक विष्णु ढाकणे यांनी या कार्यक्रमास गणवेशात उपस्थिती लावून ध्वजारोहण प्रसंगी आदेश देत संचलन केले.