कोपरगाव शहरात फक्त राडा, शहर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव शहरात किरकोळ मारामारी ह्या नित्याच्या झाला आहेत. त्याचा आज कडेलोट होतोय. किरकोळ कारण असले तरी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असुन त्यातुनच पुन्हा मारामारी होवुन दोघे गंभीर झाल्याची घटना कोपरगाव शहरात घडली. 

  शहरातील बस स्थानक शेजारील परिसरात मागील भांडणाच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अवैध व्यवसायातून सदर हाणामारी झाल्याची चर्चा शहरात सुरु होती. जखमींवर शिर्डी येथील रुग्नालयात उपचार सुरु आहेत. सदर घटना दि. १७ जून रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत नयन संजय  मेहरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी आझर शेख, राजू डगळे, इरफान शेख, फौजल सय्यद व इतर दोन ते तीन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला. शहरात नागरिकांना नेमके काय चालले आहे याचा अंदाज आला नाही. काही वेळ तणावाचे वातावरण होते. पोलीस बंदोबस्तात वाढ केल्याने वातावरण निवळले.  

बसस्थानकासह शहरातील विविध ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. शहर पोलिसांचा त्यावर वचक नसल्याने सदर घटना घडली असल्याची चर्चा आहे. शहरात अधून-मधून छोट्या मोठ्या हाणामारीच्या घटना या नित्याच्या झाल्या आहेत. कोणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे सुरु आहेत. त्याचा छडा लावावा शहरात कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी होत आहे.

फिर्यादीत म्हंटले कि, पाठीमागील भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल डी. आर. तिकोने हे तपास करत आहे.