दाट धुक्याने तालुक्यात जमीनीवर आकाश आल्याचा भास

कोपरगाव तालुक्यात वाहनचालकांनी दिवसा लावले दिवे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३०: कोपरगाव तालुक्यात सोमवारी पहाटे सहाच्या दरम्यान अचानक धुके वाढत गेले आणि काही क्षणात संपूर्ण परिसर धुक्याने झाकल्याने सर्वञ जमीनीवर ढग जमा झाल्याचे चिञ दिसत होते. जसा जसा दिवस उगवत होता तसतशी धुक्याची स्पष्टता अधिक दिसु लागली.

सकाळी तब्बल साडे नऊ वाजेपर्यंत धुक्याची लाट ओसरली नव्हती. नगर मनमाड महामार्गावरील मोठमोठ्या वाहनधारकांना समोरचे काहीच दिसत नव्हते. गाडीचा लाईट लावला तरी धुक्यापुढे प्रकाश सुध्दा फिका पडत होता. सकाळचे साडे नऊ वाजले तरी दिवे लावून प्रवास करण्याची वेळ नागरीकांवर आली होती. धुके जरी दाट असले तरी थंडीचा प्रभाव अतिशय कमी होता. प्रथमच सकाळी उशिरापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने माणसांना माणसं दिसत नव्हती.

संपूर्ण तालुक्यावर ढग कोसळल्याचा भास होत होता. नजर जाईल तिकडे फक्त ढग दिसत होते. मोटारसायकल चालवणाऱ्याना वाटते होते कि, आता जमीनीवरचा रस्ता संपला आणि आपण आकाशात गाडी चालवतोय की काय असे चिञ धुक्याने निर्माण केले होते. अचानकपणे पडलेल्या दाट धुक्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.  सुदैवाने या दाट धुक्यामुळे कोणताही अपघात अथवा जिवीत हानी झाली नाही. काही नागरीकांनी या दाट धुक्यामध्ये फिरण्याचा आनंद घेतला.