काळे महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्कुल कनेक्ट अभियाना अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० स्कूल कनेक्ट अभियान कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्लॅनिंग व डेव्हलपमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेची सुरवात विद्यापीठ गीताने करण्यात येवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र. कुलगुरू व विविध विद्या शाखांचे प्रमुख यांच्या शुभेच्छा संदेशाचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शैक्षणिक व्यवस्थेत झालेल्या बदला संदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला भोर उपस्थित होत्या. या कार्यशाळेत बदलते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. या धोरणाने शिक्षण प्रवाहात सहभागी असलेले विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून काही कारणास्तव प्रथम वर्षी किंवा द्वितीय वर्षी तसेच तृतीय वर्षी बाहेर पडले तर त्यांच्या हातात पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणार आहे.
यामुळे शिक्षण प्रवाहापासून दूर झालेले विद्यार्थी शिक्षण प्रवाहात येतील. यामध्ये मल्टीपल एन्ट्री व मल्टीपल एक्सिटची सुविधा उपलब्ध आहे. या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास वाढ होणार असून आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम शिकण्याची संधी या शैक्षणिक धोरणाने मिळणार आहे. नोकरी करीत शिक्षण घेण्याची सवलत असल्याने या शैक्षणिक धोरणाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास डॉ. उज्वला भोर यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे कौशल्य आधारीत शिक्षण धोरण असून या धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नवनिर्मितीची क्षमता विकसित होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पांडुरंग मोरे यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयीन परिसरातील माहेगाव देशमुख, भरतपूर, कुंभारी, उजनी, मंजूर, झोपेवाडी, रामपूर, कोळपेवाडी, शिंदेवाडी, सुरेगाव येथील पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.उमाकांत कदम व प्रा. सागर मोरे यांनी केले. तर प्रा. विनोद मैंद यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.