महसूल कर्मचाऱ्यांनी सेवक म्हणून काम करावे – तहसीलदार सांगडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : शासनाच्या  विविध  विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच  राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यातून गरजू लाभार्थीना त्या उपक्रमाचा लाभ मिळायला हवा. या पवित्र कार्याचे पायीक होण्याचे भाग्य  महसूल विभागाचे सेवक म्हणून आपल्या वाटयाला आले आहे याचे भान ठेवून हे काम करावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले.

येथील तहसील कार्यालयात एक ते पंधरा ऑगष्ट कालावधीत आयोजित ‘महसूल पंधरवाडा’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसील कार्यालयाच्या पोर्च मध्ये भव्य अशी विविध रंगी आकर्षक रांगोळी काढून सर्वांचे स्वागत करण्यात आले होते. मंचावर गटविकास अधिकारी राजेश कदम, नायब तहसीलदार गौरी कट्टे,  निलेश वाघमारे, राजेंद्र  बकरे, डॉ. राहूल चव्हाण डॉ. संचिता तुपे उपस्थित होत्या. यावेळी आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर तसेच  मुख्यमंत्री लाडकी बहिण लाभार्थीं अर्ज मान्यता आदी उपक्रम राबविण्यात आले.

महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले खटले सामंजस्याने सोडवण्यात येतील. ग्रामीण भागांमध्ये आठ अ खात्याचा उताऱ्याचे वाचन होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना कायदेशीर वारस शोधता येतील म्हणजे मृत आहेत. त्याची माहितीही मिळू शकेल व त्याची मतदार यादीतून नाव कमी करण्यात मदत होईल.
            -प्रशांत सांगडे, तहसीलदार. 

  यावेळी सांगडे म्हणाले, महसूल पंधरवाडा या कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरणार असून कर्मचाऱ आपण सर्वसामान्यांच्या घरोघर जाऊन ही माहिती देण्याची संधी साधावी. या पंधरवड्यात प्रलंबित कामाचा निपटारा करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपले प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत.  युवा संवादाद्वारे आपण स्वतः युवकांशी संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर महसूल खात्यातील योजनांबाबत अधिकाऱ्यांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे नाव मतदार यादीत नोंद करण्यात येणार आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाच्या तरतुदीनुसार मदत करण्यात येणार आहे.

माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी तलाठी यांना माजी सैनिकांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीर माता वीर पत्नी यांच्या समस्यासुद्धा सोडविल्या जातील. महसूल खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाला की नाही त्याची तपासणी करण्यात येणार आहे. शुक्रवारी महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी तहसीलदार कार्यालयात आरोग्य शिबिर भरवण्यात येऊन तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. या पंधरा दिवसांमध्ये महसूल खात्यातील ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी यावेळी सांगितले.