शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेवगाव तालुक्याचे विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने कधी अर्ज, विनंत्या तर कधी हटके आंदोलन करण्यात माहिर असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे प्रवर्तक डॉ. निरज लांडे यांनी यावेळी वेगळ्या मार्गाने गांधीगिरी करत नगरपरिषदेचे लक्ष काही अडचणीकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी मूळ समस्येला बगल देत ती वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.
या निवेदनात लांडे डॉ. लांडे म्हणतात की महोदय, आपणाकडे नम्र निवेदन करण्यात येते की, गेल्या अनेक वर्षांपासून शेवगाव शहरातील मूलभूत प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून दुर्लक्ष होत आहे. या कारणांनी शहरातील हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. आता नागरिकांना तो त्रास देखील होणार नाही आणि शहराचा लौकिक वाढेल शिवाय त्यातून नगरपरिषदेला कायम स्वरूपी उपन्नाचा श्रोतही उपलब्ध होईल असे नमुद करून त्यांनी काही विधायक सुचना मुद्देसुद मांडल्या आहेत.
येथील बीएसएनएल कार्यालया समोरचा पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल मार्ग दोन वेळेस काँक्रिटीकरण होऊनही त्या रस्त्यावरती आज अगणित खड्डे निर्माण झाले आहेत. त्यावर तिसऱ्यांदा दुरुस्ती खर्च करण्या ऐवजी या खडयास रांजण खळग्याचा दर्जा मिळावा असा शासनाकडे प्रस्ताव करुन तो पर्यटन विकास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जावं. त्या निमित्ताने नगरपरिषदेला कायम स्वरूपी उत्पन्नाचा लाभ होऊ शकेल !
शहरातील समर्थ व्यायाम शाळेसमोरील, खंडोबा मैदान भागात साठत असलेल्या पाण्याला शासकीय तलाव म्हणून घोषित करावे. त्या ठिकाणी नगरपरिषदे मार्फत मत्स्योत्पादनाचा व्यवसाय सुरू करावा . जेणेकरून तो कायम स्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत व्हावा यासाठी पावसाळ्या व्यतिरिक्त कालखंडात शेवगावकरांना पंधरा दिवसा ऐवजी सोळाव्या दिवशी नळाचे पाणी सोडावे व बचत होणारे एक दिवसाचे पाणी घोषित तलावात सोडावे म्हणजे मत्स्योत्पादनात खंड पडणार नाही.
शेवगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये स्थानिक व बाहेर गावचे हजारो ग्राहक, व्यापारी, महिला – पुरुष यांचा रोजच राबता असतो. परंतु या सर्वांसाठी संपूर्ण शहरात एकही सुलभ शौचालयाची सोय नाही. म्हणून आमच्यासह अनेक जणांनी मुख्य बाजारपेठेत सुलभ शौचालयाची सोय असावी अशी मागणी केली असली तरी नगरपरिषदेच्या सुज्ञ प्रशासनाने आपल्या भव्य बाजार पेठेच्या सौंदर्याला ठेच पोहचेल. जागोजागी असलेल्या उघडया गटारीच्या दुर्गंधीत भर पडेल या उदात्त हेतूने या मागणीकडे आपण दूरदर्शीपणे दूर्लक्ष केले हे पटले आहे.
या संदर्भात एकूणच नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतूक करण्यासाठी पुढील आठवड्यात प्राथमिक स्वरूपात या रस्त्याच्या एखाद्या खड्ड्यात सत्यनारायण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवूया, आपण या प्रसंगी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह तीर्थप्रसादासाठी उपस्थिती लावावी अशी विनंती करण्यात आली आहे.