शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : जन्मतः तसेच एखाद्या जीव घेण्या अपघाताच्या घटनेत कायमचे दिव्यांगत्व नशिबी आलेल्यांनी जीवनात निराश होण्याऐवजी आपल्या अंगभूत कलेच्या माध्यमातून आकाशाला गवसणी घालून उत्तुंग यश मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसे यहा प्राप्ती साठी दिव्यांगांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या मंजूर होऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य आले पाहिजे. सत्ता असो अथवा नसो आपण सातत्याने दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला असून पुढील काळातही तालुक्यातील दिव्यांगांना योग्य ते सर्व सहकार्य राहील असा विश्वास माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी व्यक्त केला.
प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि ९) संभाजीनगर येथे पार पडणाऱ्या दिव्यांग जन आक्रोश मोर्चा आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते, महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चारशे दिव्यांग बंधू भगिनी सहभागी होण्यासाठी विविध वाहनातून रवाना झाले. त्यांना माजी आमदार घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात निरोप देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
प्रहार सावली दिव्यांग संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हनवते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ते म्हणाले की, शेवगाव शहर व तालुक्यात दिव्यांग बांधवांची संख्या दीड हजाराच्या आसपास आहे. दिव्यांग बांधवांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये पेन्शन मिळावे. दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा मोफत मिळावी. दिव्यांगाची वीस लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी काढून मिळावी त्यांना विविध व्यवसायासाठी जागा व खेळते भांडवल मिळावे. इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा आंदोलन पुकारण्यात आले आहे. आजचे आंदोलन यशस्वी ठरणारच तसेच आम्हा दिव्यांग बांधवांच्या सर्व मागण्या मंजूर होणार असा आत्मविश्वास हनवते यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख, किशोर गरंडवाल, सुभाष मोहिते, सुजाता बडे, सुनीता नांगरे, सिद्धार्थ बटुळे, लक्ष्मण अभंग, दादासाहेब कणसे, प्रभाकर आव्हाड आदींसह शहर व तालुक्यातील दिव्यांग आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले आहेत यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, ताहेर पटेल, कैलास तिजोरे, जाकिर कुरेशी सोहेल पठाण फिरोज पटेल आदिसह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.