बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचारा बाबद पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : काही दिवसा पासून बांगलादेशमध्ये होणाऱ्या सनातन हिंदू धर्मियांवरील अत्याचार त्वरित थांबविण्याच्या दृष्टीने आपण स्वतः जातीने लक्ष घालावे व तेथील लष्करी सत्तेला समज देऊन हिंदूना आश्वासित करावे अशा आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेवगावच्या सकल हिंदू समाज बांधवांनी पाठविले असून त्याच्या प्रती शेवगावचे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  डॉ. नीरज लांडे पा. जगदीश धूत, डॉ. कृष्णा देहाडराय, अमोल माने, अमोल घोलप, मच्छिंद्र बर्वे, मनोज कांबळे, नवनाथ कवडे, दिलीप सुपारे, गणेश भालेराव, विजय काथवटे, चंद्रकांत मोहिते यांची उपस्थित होती.

पंतप्रधानाना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  बांगला देशात ‘झालेल्या सत्ता बदलामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजावरती अतोनात अत्याचार होत आहेत. चौकाचौकात हिंदूंना मारले जात असून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. हिंदूंची घरे निवडून त्याची जाळपोळ करून लुटालुट केली जात आहे. त्या ठिकाणच्या हिंदूंना जबरदस्तीने धर्म परिवर्तन करायला भाग पडले जात आहे, हेअतिशय चिंताजनक आहे.

भारताबाहेरील प्रत्येक हिंदूचे संरक्षण करणे व त्यांच्या समस्या सोडविणे एक हिंदू राष्ट्र म्हणून भारताचे प्रथम कर्तव्य आहे. तेथील हिंदूंना सुद्धा भारताकडून व आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आपणास नम्र विनंती की आपण जागतिक स्तरावर याची गांभीर्याने चर्चा करून बांगलादेशच्या सध्याच्या काळजीवाहू लष्करी सरकार वरती दबाव आणून तेथील आपल्या हिंदू बांधवांचे, आई- बहिणींचे संरक्षण करावे. तसेच बांगलादेशी नागरिक जे भारतामध्ये राहत आहेत त्यांना देखील त्वरित भारत देशांमधून त्यांच्या देशामध्ये बांगलादेशमध्ये पाठवून द्यावे. अशी विनंती शेवटी करण्यात आली आहे.