फसवणूक करणाऱ्याना तात्काळ अटक करावी म्हणून वंचितचा मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेअर मार्केट मधून अधिक परतवा देण्याचे अभिष दाखवून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आज सोमवारी वंचित बहूजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चहाण यांचे नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस ठाण्यावर शेअर मार्केट चालकांवर एमपीआयडी व एसआयडी अंतर्गत गुन्हे दाखल करून त्वरित अटक करावी या मागणीसाठी ‘मोर्चा काढला. यावेळी फसवणूक झालेले गुंतवणूकदार हाती फलक घेऊन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

शेअर मार्केट चालकाविरुद्ध एम पी आय डी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत यासाठी शेवगाव पोलिसांना आता पर्यंत तीन निवेदने देण्यात आली मात्र कारवाई झाली नाही. म्हणून आजचा चौथा मोर्चा काढण्यात आला. आता पर्यंत या प्रकरणी फक्त १९ गुन्हे दाखल झाले आहेत तर ९ जणांना अटक करण्यात आली आहे.        

यावेळी वरखेड सांगवीचे चेअरमन सुभाष आंधळे, वंचितचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, महिला आघाडीच्या संगिता ढवळे, पाथर्डी तालुका  महिला अध्यक्ष  सुनिता जाधव,उपाध्यक्ष रोहिणी ढोंबे, शेवगाव शहर अध्यक्ष चंदाताई खंडागळे, युवा आघाडी प्रितम गर्जे, रवींद्र निळ, सागर गरूड, विशाल इंगळे, बाळासाहेब विघ्ने इत्यादी सह अनेक गुंतवणूकदार मोर्चात हजर होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी  गुंतवणूकदारांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन  मनोगत व्यक्त केले. प्रा.चव्हाण यांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवण्याची मागणी केली असता पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी असे स्वतंत्र गुन्हे दाखल करता येत नाहीत असे सांगितले. त्यावर प्रा चव्हाण यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.

यावेळी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार भगिनिनी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे व पोलीसांना राख्या बांधल्या व बहिणीचे संरक्षण करा, अशी मागणी केली.