खत कंपनीच्या धोरणाविरोधात खत विक्रेत्यांचे आमदार राजळे यांना निवेदन
शेवगाव प्रतिनिधी , दि. १० : खत उत्पादक कंपन्याच खाता सोबत लिंकिंग करून अन्य अनावश्यक उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र ग्राहकांच्या तोंडावर किरकोळ वितरक असल्याने
त्यानाच होणार्या वादाला व बदनामीला सामोरे जावे लागते. म्हणून शासकीय स्तरावरच लिंकिंगला कायदेशीर पायबंध घालावा. अशी मागणी तालुक्यातील रासायनिक खत व्यापारी संघटनेने आमदार मोनिकाताई राजळे यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी या अगोदर २४ ऑगस्ट २०२२ ला बंद पाळून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र शासनाने त्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे खत विक्रेत्या कंपन्यांची मुजोरी आणखीनच वाढत गेली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२२ ला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या समवेत सर्व कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
तेव्हा कोणत्याही कंपनीच्या खतावर इतर साहित्याची लिंकिंग केली गेली तर संबंधित कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी तंबी त्यांनी दिली होती. मात्र जिल्हा जिल्हाधिकाऱ्याच्या या आदेशाला जुगारून मुजोर खत कंपन्यांनी लिंकिंगची प्रक्रिया आज पर्यंत बंद केलेली नाही. त्यामुळे किरकोळ विक्रेता व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचे वाद निर्माण होत आहेत.
तालुक्यातील कृषी सेवा केद्र चालकांना खातासोबत होणाऱ्या लिंकिंग साहित्याच्या सक्तीमुळे खत व्यवसायिक सध्या त्रस्त असून शासकीय स्तरावरून या पद्धतीचा सोक्षमोक्ष लावावा. तालुक्यातील एकूण १७० नोंदणी कृत कृषी सेवा विक्रेते आहेत. या सर्व विक्रेत्यांना खत कंपन्यानी अगोदरच लिंकिंग साहित्य मुबलक प्रमाणात पाठवून स्थानिक किरकोळ व्यवसायिकांची मोठी आर्थिक अडचण निर्माण केली आहे.
लिंकिंगचे दिलेले साहित्य हे गेली वर्षभरापासून धूळ खात पडून आहे. ते कालबाह्य देखील झाले आहे. तालुक्यातील सर्व व्यावसायिकांकडे जवळपास दीड दोन कोटी रुपये किमतीचे लिकिगचे साहित्य पडून आहे. याची तक्रार देखील करता येत नाही. अशी स्थिती झाली आहे. म्हणून शासन स्तरावरच याचा बंदोबस्त करावा यासाठी आपण लक्ष घालावे. त्यातून सुटका न झाल्यास कुठलीही सूचना न देता बंद आंदोलन करण्यात येईल. असे शेवटी म्हटले आहे.
यावेळी शेवगाव तालुका रासायनिक खत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, खजिनदार सुधाकर जावळे, सचिव सोपानराव घोरपडे, ज्येष्ठ कृषी केंद्र चालक जगदीश धूत, विकास खेडकर, बंडू सागडे, संदीप जावळे, रामनारायण लाहोटी, संतोष गांधी, सुरेश गर्जे, मनोज बोरा उपस्थित होते.