आगामी काळात मतदार संघाचा आमदार, राज्याचा मुख्यमंत्री बीआरएसचाच – प्रदेशाध्यक्ष माणिक कदम

‘अबकी बार किसान सरकार ‘ चा नारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : जाती व वर्णभेदा पलीकडे जाऊन विविध समस्यांच्या सोडवणूकीसाठी भारत राष्ट्र समिती हा पर्याय तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे नेतृत्वाखाली उपलब्ध झाला आहे, राव यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असून त्या सोडवण्याची त्याची तळमळ आहे. म्हणून येऊ घातलेल्या २०२४ च्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या शेतकऱ्यांचे सरकार आणण्यासाठी  सहकार्य करावे. महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे सरकार  आणण्यासाठी निर्धार करावा. शेवगाव पाथर्डीचे पुढील आमदार शेतकरी नेते संदिप राजळे यांनाच करावे असे आवाहन करून राज्याचा आगामी मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचाच राहिल. अशी ग्वाही देखील पक्षाचे राज्याध्यक्ष माणिक कदम यांनी यावेळी दिली.

       शेवगाव येथे भारत राष्ट्र समितीच्या शेवगाव मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पक्षाचे राज्य समन्वयक दशरथर सावंत यांचे अध्यक्षतेखाली, कार्याध्यक्ष  बाळासाहेब सानप, समितीचे शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे समन्वयक संदीप राजळे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कदम मार्गदर्शन करत होते.

    यावेळी समन्वयक संदीप राजळे म्हणाले, शेवगाव पाथर्डी मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या वेगळा असून या मतदारसंघांमध्ये विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत मतदारसंघांमधील तीनही साखर सम्राट व प्रस्थापित पुढाऱ्यांनी आलटून पालटून आमदारकी उपभोगली आहे. या दोन्ही तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात परंतु तीनही साखर सम्राटांच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध होतात.

यामध्येच मतदारसंघाच्या राजकारणाचे गुपित आहे. या तीनही प्रस्थापित पुढाऱ्यांचे मनोमिलन असून हे प्रस्थापित फक्त सात बारा उताऱ्यावरच  शेतकरी आहेत त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे घेणे नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुणीही काही बोलत नाही. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर अबकी बार किसान सरकार असा नारा त्यांनी दिला.

      यावेळी बीआरएसचे युवा नेते पप्पूदादा केदार, आदिनाथ बटुळे , मतदार संघ समन्वयक विवेक मोरे, आम आदमी पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष कृष्णा पांचाळ, सरपंच प्रकाश मगर, सरपंच गोरक्ष केदार, विश्वास दादा मोहिते अमोल विघ्ने, शरद शिरसाठ,संभाजी ढाकणे, महादेव जवरे , राजेंद्र केदार, प्रताप चित्ते अशोक , शुभम बडे, लतीफ शेख, ओंकार बडाख उपस्थित होते. कार्यक्रमात पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी सरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बाळासाहेब सानप, अॅड जगन्नाथ घुगे, दशरथ सावंत यांचीही भाषणे झाली.