गोदावरी खोऱ्यात पाणी नाही दिले तर पुढची पिढी माफ करणार नाही – अजित पवार 

 कोपरगाव प्रतिनिधी दि. २१ :  समुद्राला वाहुन जाणारे घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात जर नाही वळवले आणि हा प्रकल्प पूर्ण केलो नाही तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले की, सध्या गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे झाले आहे. मराठवाड्यासह नगर नाशिक जिल्ह्यातला पाण्याची कमतरता भासत असुन नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यावरी पश्चिमेला समुद्राला जाणारे पाणी पुर्वेला गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आमदार आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यासाठी ८५ हजार कोटींच्या प्रकल्पाची तरतुद केली आहे.  या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र सरकार कडून  मिळवणार आहे. लवकरच गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आचार संहिता लागण्याच्या आगोदर या प्रकल्पाला मान्यता मिळवण्याची तयारी सरकारच्यावतीने सुरु आहे. जर हे पाण्याचे काम आम्ही नाही केले तर आम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही असे  म्हणत अजित पवार यांनी गोदावरी खोऱ्याच्या पाण्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

 गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी खोऱ्यातील पाण्यावरून  मराठवाडा विरूध्द नगर-नाशिक वाद सुरु आहे. पाण्याचा साठा कमी आणि मागणी जास्त झाल्याने सिंचनासह बिगर सिंचनाचा पाणी प्रश्न गंभिर होत आहे. या भागातील अनेक नेत्यांनी पाण्याच्या संघर्षात आपले जीवन घालवले पण हक्काचे पाणी काही मुबलक मिळत नसल्याने शेती उजाड होत चाललीय तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

समुद्राला वाहुन जाणारे घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे गरजेचे आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधत लवकरच घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे आश्वासन यावेळी दिल्याने आशा पल्लवित होत आहेत.  यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  वेळोवेळी पाठपुरावा करुन पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधत आहेत.