बोधेगांव परिसरातील चोरट्यांचा बंदोबस्त करा – नितीन काकडे

माजी जिप. सदस्य नितीन काकडे यांचा उपोषणाचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : शेवगांव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगांव परिसरात मोठ्या प्रमाणात चोरट्यांची दहशत पसरली असून, गेल्या १५ दिवसापासू परिसरातील वाडया वस्त्यांवर चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. आघाव वस्तीवर दरोडेखोरांच्या मारहाणीत पतीपत्नी गंभीर जखमी झाले आहेत ते अजुनही दवाखाण्यात उपचार घेत असून संपूर्ण आघाव कुटुंब भेदरलेले आहे.

गेल्या वर्षी याच आघाव वस्ती नाजिक असणाऱ्या गमे वस्ती, ढाकणे वस्ती, तर मुरमीला दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी महिलेला चाकूने भोकसून गंभीर जखमी केले होते. या सर्व घटनेचा तपास लावण्यास पोलीसांना अपयश आले आहे. या सर्व घटना आणि गेल्या १५ दिवसा पासुन परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी भयभित झाले आहेत.

परिसरात रात्रीचे ड्रोन फिरत आहेत. नागरिक रात्र जागुन काढीत आहेत. चोरटयांचा बंदोबस्त करून बोधेगावी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु करा या मागणीसाठी माजी जिप सदस्य नितीन काकडे यांनी पोलीस आधिक्षकांना लेखी निवेदन देवुन अन्यथा बोधेगांव  दुरक्षेत्रा समोर प्राणांतिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

सुमारे ३५ गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले बोधेगांव येथे ब्रिटीश  काळापासून पोलीस दुरक्षेत्र आहे. परंतु त्यावेळची लोक संख्या आणी आताची लोकसंख्या यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आता एकट्या बोधेगावचीच लोकसंख्या अंदाजे १७ – १८ हजाराच्या दरम्यान आहे. तर चापडगांव, बालमटाकळी, मुंगी, कांबी, हातगांव, लाडजळगांव ही मोठ्या लोकसंखेची गावे आहेत. यासह गोळेगांव, नागलवाडी, राणेगांव, शेकटे, दोन्ही अंतरवल्या, सोनविहीर, पिंगेवाडी, शेकटे, खामपिंप्री, अधोडी, इत्यादी ३०ते ३२ गावे बोधेगांव पासून २ ते १० किमीच्या अंतरावर आहेत. ही सगळी गावे बोधेगांव पोलीस दुरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येतात.    

पोलीस उपनिरिक्षक व सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. पण आणीबाणीच्या प्रसंगी एखादा कर्मचारी किंवा कोणीच नसते. गेल्या सुमारे १५ वर्षापूर्वी  बोधेगांवला  स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव त्यावेळच्या पोलीस अधिक्षकांनी नाशिक विभागीय परिक्षेत्राचे विषेश पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. त्यांनी सकारात्मक टिपणी देवुन प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवला होता. पोलीस महासंचालकांनी बोधेगांवला स्वतंत्र पोलीस ठाणे मंजुरीसाठी राज्याच्या गृह मंत्रालयालयाकडे पाठवला तेव्हा पासुन हा प्रस्ताव  मंत्रालयात धुळखात पडला आहे.

बोधेगाव नंतर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी आणी नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे प्रस्ताव मार्गी लागुन सुरु झालेत. बोधेगाव परिसरात दरोडा, चोऱ्यामाऱ्या किंवा गुन्हेगारीच्या घटना घडल्यावर स्वतंत्र पोसीस ठाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे चोरट्यांच्या दहशतीतुन परिसर भयमुक्त करून स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा या मागणीसाठी नितीन काकडे २८ ऑगष्ट पासुन प्राणांतीक उपोषणास बसणार आहेत.