‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कोल्हे कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : नॅशनल फेडरेशन नवीदिल्ली यांच्या स्वच्छता सेवा उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सेंद्रिय खत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत एक वृक्ष आईच्या नावांने (एक पेड माँ के नाम) या संकल्पनेतुन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान कार्यक्रम शुक्रवारी राबविण्यात आले.

सुतार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे सतत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंती व पुण्यतिथीचे औचित्य साधत तसेच विविध वाढदिवस नैमित्तीक समारंभानिमीत्त कारखाना परिसरासह कोपरगांव शहर तसेच ग्रामिण भागातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत- सोसायटी कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आदि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणांत मोफत वृक्ष पुरवुन त्याची लागवड करून संगोपनाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवितात. त्याच पावलांवर पाउल ठेवत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाचे सर्व अभियान कारखाना परिसरात तसेच सभासद शेतक-यांच्या बांधावर नियमीतपणे राबविण्यांत येतात.

नॅशनल फेडरेशन नविदिल्ली यासंस्थेने राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना त्या त्या भागात (एक पेड माँ के नाम) आईची आठवण म्हणून वृक्षारोपण करावे असे अभियान राबविण्यांबाबत कळविले होते, त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख आदिंनी सहभाग घेत शुक्रवारी मोठ्या प्रमाणांत देशी वाण असलेले लिंब, वड, पिंपळ, करंज, अमलताज, लक्ष्मीतारू, बकुळ आदि विविध जातींचे वृक्षांची लागवड करण्यांत आली, जेणेकरून आगामी काळात त्याचा पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मोठया प्रमाणांत उपयोग होईल असे ते शेवटी म्हणाले.

याप्रसंगी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, एच. आर. प्रदिप गुरव यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.