कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी कोपरगाव नगरपरिषद व तहसील कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळेतील विद्यार्थी व विविध सामाजिक संघटना यांचेमार्फत मतदार जनजागृती रॅली तहसील कार्यालयापासून सुरु होऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे संपन्न झाली.
लोकांचे सरकार, लोकांद्वारे आणि लोकांसाठी हि अभिव्यक्ती तेव्हाच अचूक आहे जेव्हा प्रत्येक नागरिक निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो. मतदान प्रक्रियेचे महत्व आणि देशाचे भवितव्य ठरविताना प्रत्येक मताचे महत्व या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी मतदारांच्या विचारामध्ये मुलभूत बदल होणे आवश्यक आहे.
त्याकरिता नगरपरिषद प्रशासन व तालुका प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली एस.जी.विद्यालय, एम.के.आढाव विद्यालय, सेवा निकेतन, के.बी.पी. विद्यालय, सी.एम.मेहता विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वृंद तसेच लायन्स-लिओ-लायनेस क्लब, रोटरी क्लब, गोदामाई प्रतिष्ठान, सूर्यतेज संस्था व व्यापारी महासंघ यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. तहसील कार्यालय येथे मतदार शपथ घेण्यात येऊन रॅलीस मा.तहसिलदार महेश सावंत व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी झेंडा दाखवून रॅली सुरु करण्यात आली.
सदर रॅली तहसील कार्यालयापासून सुरु होऊन शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली व तहसील कार्यालय येथे संपन्न झाली. तहसील कार्यालय येथे सी.एम.मेहता विद्यालयामार्फत मतदार जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.
दि.२० नोव्हेंबर २०२४ वार बुधवार रोजी २१९-कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरिता मतदान होणार आहे. सदरील मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करण्याकरिता आपण सर्वांना मिळून प्रयत्न करावयाचे आहेत, त्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळंके यांनी उपस्थितांना केले.