विद्यार्थ्यांना अर्थिक साक्षरतेचे धडे देण्याची आवश्यकता – ऋषिकेश वाघ

शेवगाव प्रतिनीधी, दि. ५ : विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळातच ज्ञानार्जनाबरोबर अर्थिक साक्षरतेचे धडे देण्याची आवश्यकता आहे. भविष्याचा विचार करून बचतीची सवय तसेच योग्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमुळे कुटूंबात अर्थिक स्थैर्य प्राप्त होते. जपान देश हा जगात सर्वात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणारा देश आहे. काही वर्षात भारतही शेअर मार्केट मध्ये सर्वांधिक गुंतवणूक करणारा देश होईल. मात्र त्यासाठी सर्वांनी अर्थिक साक्षर होण्याची गरज आहे, असे मत अहिल्यानगर सीए असोशिएशनचे सदस्य ऋषिकेश वाघ यांनी व्यक्त केले.

 येथील पद्मभुषण बाळासाहेब भारदे विद्यालयात बुधवारी (दि. ४) शेवगाव रोटरी क्लबने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.          व्यासपीठावर रोटरीचे डॉ. संजय लड्डा, सीए असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष सनी मुथ्था, सीए अमोल कासोळे, उपप्राचार्य संजय कुलकर्णी, डॉ. मयुर लांडे  उपस्थित होते.

 वाघ म्हणाले, शासन हे कर प्रणालीवर जनतेसाठी इंफ्रास्टक्चर व लोककल्याणकारी योजना राबविते. आयकराच्या रूपाने प्रत्यक्ष कर हे शासकिय व निमशासकिय लोक भरतात. तर अप्रत्यक्ष कर हा जीएसटीच्या रूपाने सर्वांकडून शासनाकडे जमा होतो. लाडकी बहिण सारख्या योजना या ख-या तर आपल्याच खिशातून शासनाने सुरू केल्या आहेत. शेवगाव तालुक्यात शेअर ट्रेडींगच्या माध्यमातून सुमारे तीन ते साडे तीन हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला, ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.

अर्थिक साक्षरता नसल्याचा हा दुष्परिणाम आहे. मोबाईल मध्ये अनेक अॅप्स व फसव्या जाहिरातींना बळी पडले तर संपु्र्ण बॅंक खाते हॅक होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोबाईलचा पासवर्ड, एटीएम व नेट बॅंकीगचा पीन क्रमांक आपण कोणालाही सांगू नये. तो फक्त आपणालाच माहिती असावा.

जगात भारतातील कररचना ही किचकट असून ५६० विभाग त्यात असून त्या विभागात आणखी उपविभाग आहेत. गुंतवणुकीचे प्रकार व आपल्या अर्थिक क्षमतेनुसार आपण कोठे गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होऊ शकेल यासाठी अर्थिक साक्षरतेचे धडे शालेय व महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना शासनाने देण्याची गरज आहे.

       डॉ. लड्डा यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सायकलचा वापर करून आपले आरोग्य चांगले ठेवावे. व्यायामाची सवय जोपासावी. असा सल्ला दिला. राज्यआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश घेवरीकर यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य कुलकर्णी यांनी आभार मानले. 

Leave a Reply