अंधाऱ्या राञीत विजांच्या कडकडाटाने नागरीक भयभित
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : हिवाळा सुरु असताना पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले. कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी राञभर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. मध्यराञी अचानक थंडी गायब झाली आणि विजांचा लखलखाट सुरु झाला. पाऊस येताच विजवितरण कंपनीने नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा बंद केल्याने अंधारात विजांचा लखलखाट तसेच आकाशातून पडणाऱ्या विजांचा आवाज माणसांची धडकी भरवणारा होता.
गुरुवारी राञी ११ वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजे पर्यंत जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. तालुक्यातील सर्व मंडळात मिळून सरासरी ४५ मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहीती महसुली विभागाने सांगितले. राञभर पडणाऱ्या विजा व पावसाने तालुक्यात कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचे सांगितले आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हरभरा, गहु, कांदा पिकासह इतर पिके, फळबागांचे नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक वातावरणातील झालेल्या बदलामुळे उभ्या पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान राञभर आलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते गटारी चकाचक झाल्या तर विजेच्या कडकडाटाने लहान मुलं, वृध्द नागरीक घाबरून गेले होते. घराचे दारं खिडक्यांच्या आवाजाने वातावरण भितीचे झाले होते.
महावितरण विभागाने नेहमीप्रमाणे विद्युत पुरवठा खंडीत करुन नागरीकांना राञ अंधारात काढायला लावली. विज पुरवठा बंद का झाला या संदर्भात विचारण्यासाठी सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बिघाड नक्की कुठे झाला हे सांगता येत नाही कदाचित कुठेतरी झाडांच्या फांद्या तारांना चिकटल्या असल्याने तांत्रिक बिघाड झाला असेल लवकरच बिघाड दूरुस्त करुन विजपुरवठा पुर्ववत करणार असल्याचे सांगितले.